दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२२ । फलटण । गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. ‘अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति | नायं लोकोsस्ति न परो न सुखं संशयात्मनः ||
अर्जुना ऐक – ज्या प्राण्याच्या ठिकाणी ज्ञानाची आवड नाही, त्याच्या जगण्याला काय म्हणावे? त्यापेक्षा मरण चांगले! जो आत्म्याला जाणत नाही, ज्याचे मन संशयी असून त्यात कसलीही श्रध्दा नाही त्याचा विनाश होतो. अशा संशयी पुरुषाला इहलोक मिळत नाही, परलोक मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. ज्याला ज्ञानाची आस नाही तो संशयरुपी भोवऱ्यात अडकतो. अर्जुना, ज्ञानाची गोष्ट कशाला! तो जर त्या ज्ञानाची इच्छाही मनात धरीत नसेल, तर तो संशयरुपी अग्नीत पडलाच असे समज.
जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा || या श्रीकृष्णाच्याच वचनाचा विचार करता प्रत्येकाच्या अंतःकरणात ईश्वरी तत्त्व आहे. आत्मा हा ईश्वरस्वरुप असेल तर त्याची जाणीव प्रत्येक जीवाला का होत नाही? तेथे संशयाची भुते का नाचतात? ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर शब्दात सांगतात.. ज्याच्यामध्ये ज्ञानाचा अभाव असतो तो अज्ञानाच्या निबिड अंध:कारात पडतो, त्यावेळी मनात संशय वाढतो. तो संशय केवळ हृदयात न राहता बुध्दीलाही ग्रासतो आणि मग सत्य – असत्याचे, नीती – अनीतीचे भान त्या व्यक्तीला राहात नाही. भारतीय परंपरा सांगते ‘ईश्वर सत्य आहे’, संतांचे तत्वज्ञान सांगते ‘सत्यच ईश्वर आहे आणि मानवी जीव सत्य आहे तर तोच ईश्वर आहे.’ मनुष्य जन्म हे ईश्वराचे देणे आहे. तुम्ही न मागता ते मिळाले आहे. आपण ते फक्त स्वीकारायचे आहे. ते स्वीकारुन कोठेही जायचे नाही. फक्त स्वतःजवळ पोहोचायचे आहे. आपणच आपल्या स्वतःला ओळखायचे आणि भेटायचे आहे.
साधकांनो, स्वतःला ओळखणे हेच अव्दैत आहे आणि स्वतःला भेटणे हाच ईश्वरी साक्षात्कार आहे. ईश्वर अन्यत्र कुठे नाही. तत्वमसि.. म्हणजे तुम्हीच तो आहात आणि तोच तुमच्या रुपाने वावरणारा आहे. आपल्या जाणिवेवर पडदा आहे अज्ञानाचा, नजरेसमोर मळभ आहे मीपणाचे आणि मनावर आवरण आहे अहंभावाचे. आपल्याला या तीन गोष्टी दूर करायच्या आहेत. मग जीवा-शिवाची भेट दूर राहत नाही. तो तर वाटच पाहत थांबला आहे. तुम्हीच तेवढे पाऊल उचलायचे राहिले आहे. अज्ञानाचा पडदा उचलायचा, मीपण नाकारायचे, अहंकार टाकायचा. ते करता आले की पुढचा सगळा प्रवास प्रकाशाचा आणि वाटचाल अमृताची आहे.
ईश्वर चराचर विश्वात व्यापून उरला आहे असे आपण मानतो. म्हणजेच हे आकाश, हा वारा, हे तेज, हे पाणी आणि नानाविध रत्नांची खान असलेली वसुंधरा हा त्याच्याच जड – चेतनेचा अनुबंध आहे. या अनुबंधातच कुठेतरी वृक्षसृष्टी आहे, जीवसृष्टी आहे आणि यातच तुमची व माझी मानवी सृष्टीही आहे. ईश्वर आपले चैतन्य या जडात उमटवतो. म्हणूनच ज्ञानेश्वर म्हणतात ‘तया सर्वात्मका ईश्वरा..’ किंवा पसायदान मागताना ‘आता विश्वात्मके देवें..’ हे शब्द त्यांच्या मुखातून सहज बाहेर पडतात. मतितार्थ- ईश्वरी चैतन्य आपल्या हृदयस्थ आहे. अज्ञानापोटी आपल्याला त्याची जाणीव होत नाही. मग आपले मन सैरभैर वाऱ्यावर हिंडत राहते आणि विषयांच्या अधीन होऊन संशयी बनते. ज्याचा आत्मा संशयी बनला त्याचा विनाश अटळ आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रुपाने अखंड मानवाला या श्लोकाव्दारे सावध करतात.. आणि ज्ञानेश्वर महाराज प्रकाशाची, ज्ञानाची कास धरा हा संदेश देऊन मार्ग दाखवतात. त्या वाटेवरुन चालणे हीच साधकाची सत्य साधना आहे.
|| राम कृष्ण हरी || भवःतू सब मंगलम ||
© राजेंद्र आनंदराव शेलार
[email protected]