महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त निरगुडीतील महात्मा फुले नगर येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू


दैनिक स्थैर्य | दि. २९ नोव्हेंबर २०२३ | सातारा |
निरगुडी गावातील महात्मा फुले नगर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून होलार समाज सांस्कृतिक भवन येथे अभ्यासिका शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून केली.

महेंद्र गोरे यांनी प्रास्ताविकात होलार समाजामध्ये सामाजिक परिवर्तन व्हावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी माझ्या सहकार्‍यांच्या मदतीने होलार समाज सांस्कृतिक भवन येथे आम्ही अभ्यासिका सुरू करत आहोत, असे सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शाळा निरगुडीचे शिक्षक सचिन काकडे सर उपस्थित होते. त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांमध्ये शिक्षणाची व वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी अभ्यासिका सारखा राबविलेला उपक्रम खूपच छान आणि कौतुकास्पद आहे, असे मत व्यक्त केले.

पत्रकार प्रशांत सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या अभ्यासिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्तापासूनच संविधानाची माहिती करून द्यायला हवी, असे सांगितले. ज्येष्ठ नागरिक वसंत गोरे, सुनिल गोरे, भिकाजी गोरे, शंभूराज गोरे यांनी मनोगते व्यक्त केली.

आभार देवराज गोरे यांनी मानले. यावेळी अनिल गोरे, प्रविण गोरे, आदेश गोरे, अक्षय आवटे, संदीप गोरे, किसन गोरे, तसेच म. फुले नगर मधील सर्व समाजबांधव उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!