दैनिक स्थैर्य | दि. २९ नोव्हेंबर २०२३ | सातारा |
मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त सातारा जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि क्रांतीसिंह नाना पाटील सार्वजनिक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व पत्रकारांसाठी विविध प्रकारच्या तपासण्या आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रविवार, दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत या तपासण्या होणार आहेत.
पत्रकारांना दैनंदिन जीवनात अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीत स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापनदिन हा पत्रकार आरोग्य तपासणी दिन साजरा करण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व किरण नाईक यांनी घेतला आहे. यानिमित्ताने राज्यभरात सुमारे १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील पत्रकारांचीही आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सातार शहर आणि तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी ही क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय येथे रविवारी, ३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत करण्यात येणार आहे.
सर्वच तालुक्यात देखील त्या ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रूग्णालयात पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी संबंधित प्रमुखांना लेखी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे त्या त्या तालुक्यातील सर्व पत्रकारांनी जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये आपल्या सर्व तपासण्या करुन घ्यावयाच्या आहेत. तालुका पत्रकार संघाने याबाबतचे नियोजन करावे. यानिमित्ताने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून त्यामध्येही सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधीस्वीकृती समितीचे अध्यक्ष व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे विभागीय अधीस्वीकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव, जिल्हा सरचिटणीस दीपक प्रभावळकर, प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, परिषद प्रतिनिधी सुजीत आंबेकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक राहुल तपासे, समन्वयक शंकर मोहिते, डिजिटल मिडियाचे राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे, राज्य महिला संघटक विद्या नारकर यांनी केले आहे.
या तपासण्या होणार
सर्व पत्रकारांचा ईसीजी काढला जाईल. रक्त, लघवी आणि शुगर तपासणी. किडनी आणि लिव्हर तपासणी, डोळे, कान, दात तपासणी, त्याबरोबरच छातीचा एक्सरेही काढण्यात येईल. एचआयव्ही, उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब याबाबतच्याही तपासण्या यावेळी करण्यात येणार आहेत, या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा जिल्हा पत्रकार संघाने केले आहे.