श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या वतीने शिक्षक दिनी सभासद शिक्षकांचा सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने वाचनालयाच्या अनेक वर्षांच्या सभासद शिक्षकांचा सन्मान करून ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात आला.

१५६ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या येथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालयात शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात कार्य करणार्‍या व वाचनालयाचे सभासद असणार्‍या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी वाचनालय संस्थेचे संचालक महेश साळुंखे होते. तर वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. मिलिंद लाटकर, सुभाष भांबुरे, रवींद्र फौजदार, विजयकुमार लोंढे पाटील, प्रा. सतीश जंगम व सचिव श्रीकृष्ण देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्रा. सतीश जंगम यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करत १५६ वर्षांचा इतिहास असणार्‍या श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाचे आता ‘ऐतिहासिक ज्ञानमंदिर’ अशी ओळख होत असून, हे ज्ञानमंदिर अद्यावत होणे अपेक्षित आहे. यासाठी वाचनालयामध्ये ई – लायब्ररी, ऑडिओ लायब्ररी, अशा सुविधा उपलब्ध करव्यात. तसेच जुनी पुस्तके आणि उपलब्ध असणारी मासिके, दैनिकांचे स्कॅनिंग करून पीडीएफ स्वरूपात जतन करून ठेवावे. भविष्यात हे संदर्भ वाचनालयाच्या विषयावर अतीउच्च पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना संदर्भासाठी उपयुक्त ठरतील असे सांगून, शालेय विद्यार्थी वाचनालयाकडे आकर्षित करण्यासाठी वाचनालयाने विविध उपक्रम राबवावेत. तसेच वाचनालयाच्या सभासदांचे व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यावर वाचनालयातील महत्त्वाची व नवीन पुस्तके व उपक्रमाची माहिती पाठवल्यास वाचनसंस्कृती समृद्ध होईल, असे सांगितले.

वाचनालयाचे सचिव श्रीकृष्ण देशपांडे यांनी वाचनालयाची माहिती देत लहान मुलांमध्ये वाचन आवड निर्माण करण्यासाठी काही दिवसात विद्यार्थ्यांसाठी शंभर रुपयात एक वर्षभर पुस्तके उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

यावेळी अ‍ॅड. मिलिंद लाटकर आणि सौ. शारदा भोसले यांनीही विचार मांडून शुभेच्छा व्यक्त केल्या. महेश साळुंखे यांनी वाचनालय राबवत असलेले विविध उपक्रम आणि वाचकांसाठी दिल्या जाणार्‍या सोयी सुविधा याबाबत माहिती दिली.

यावेळी प्रा. सतीश जंगम, रवींद्र परमाळे, सौ. शारदा भोसले, बबन कुंभार, राजेंद्रकुमार सस्ते या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

संचालक विजयकुमार लोंढे पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार व्यक्त केले. कार्यक्रमास ग्रंथपाल सुनील पवार, लिपिक मंगेश पवार, वाचनालयाचे संचालक, सभासद आणि वाचक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!