‘शासन आपल्या दारी’ उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहर्‍यावर फुलले हासू


दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२३ | सातारा |
नागरिकांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ मिळावा व त्यांचे कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे वाचावे व त्यांना सहज योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाने ‘शासन आपल्या दारी’ योजना सुरू केली. या योजनेचा शुभारंभ दौलतनगर, ता. पाटण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ८५ हजार ६६९ इतक्या लाभांचे वाटप करण्यात आले. या योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी तालुकास्तरावरही विविध मेळावे घेऊन नागरिकांना लाभ देण्यात आला. सहज उपलब्ध झालेल्या लाभामुळे लाभार्थ्यांच्या चेहर्‍यावर एकप्रकारे हासू फुलले आहे.

‘शासन आपल्या दारी’ योजनेमध्ये महसूल, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य विभाग, कृषि विभाग, नगर विकास विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यासह विविध विभागांनी लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी केली.

नागरिकांना लाभ देण्यापूर्वी गावपातळीवर ‘शासन आपल्या दारी’ अभियानाची माहिती देऊन गावातच नागरिकांकडून लाभासाठीचे अर्ज भरुन घेण्यात आले. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देवून त्याची पूर्तताही करण्यात आली. स्थानिकरित्या आयोजित मेळाव्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध दालनांद्वारे लाभाचे वाटप करण्यात आले. योजनेचा लाभ घेण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व व्यवस्था असल्याने प्रशासनाच्या पुढाकाराबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करून अशा मेळाव्यांमुळे वेळ आणि पैशाची बचत होत असून असा उपक्रम यापुढेही सुरू ठेवावा, अशी प्रतिक्रया देवून शासनाला धन्यवादही दिले.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या उपक्रमामध्ये विविध शासकीय विभागांनी प्रभावी अंमलबजावणी करुन २ लाख ८५ हजार ६६९ इतक्या लाभांचे वाटप करण्यात आले. यासाठी तालुकास्तरावरही मेळावे घेण्यात आले. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभाचे वाटप करण्यात आले. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी उपक्रमामुळे सहज विविध लाभ उपलब्ध करुन लाभार्थ्यांना दिलासा देण्याचे मोठे काम झाले आहे.

शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सातारा तालुक्यात ३८ हजार ९१३, जावली तालुक्यात १५ हजार २३, कोरेगाव तालुक्यात १९ हजार ५२१, कराड तालुक्यात – ४८ हजार ६२, फलटण तालुक्यात – ३२ हजार ७४८, वाई तालुक्यात १८ हजार ६०८, महाबळेश्वर तालुक्यात ७ हजार ७१८, खंडाळा तालुक्यात – १९ हजार १६९, माण तालुक्यात १८ हजार ७६०, खटाव तालुक्यात २६ हजार ७१८, पाटण तालुक्यात २९ हजार १०८ एवढ्या लाभांचे वाटप करण्यात आले.

सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याचा त्रास वाचावा, वेळेची बचत व्हावी व पैशाचा अपव्यय टळावा हा शासन आपल्या दारी या उपक्रमाचा उद्देश आहे. या उद्देशानुसार जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अभियानात सक्रीय सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी केले आहे.

– हेमंतकुमार चव्हाण
माहिती अधिकारी, सातारा


Back to top button
Don`t copy text!