स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१९: तामिळनाडूत
जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक स्कूटरनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी
ओलाने तेथील राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पावर २,४००
कोटी रुपये खर्च होणार आहेत. ओलाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.
ओलाचे चेअरमन आणि सीईओ भाविश अगरवाल यांनी
जारी केलेल्या निवेदनात कंपनीने म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभा राहणार आहे. या
प्रकल्पामुळे भविष्यातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील भारताचे आयातीवरील
अवलंबित्व कमालीचे कमी होईल.
याशिवाय या प्रकल्पामुळे स्थानिक
उत्पादनाला गती मिळेल, रोजगारनिर्मिती होईल, तसेच देशातील तांत्रिक
गुणवत्तेत मोठी वाढ होईल. देशामध्ये इलेर्क्टिक स्कुटरचे उत्पादन फारसे होत
नाही.
या प्रकल्पाची वैशिष्ट्ये : हा जगातील
सर्वात मोठा स्कूटर उत्पादन प्रकल्प असेल. प्रकल्पामुळे १० हजार रोजगार
निर्माण होतील. सुरुवातीला प्रकल्पातून वर्षाला २ दशलक्ष स्कूटरचे उत्पादन
होईल. हा प्रकल्प एक वर्षात कार्यान्वित होईल. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक
वाहनांचे जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारताचा उदय होईल. युरोप, आशिया आणि
लॅटिन अमेरिकेसह जगभरात प्रकल्पाचे ग्राहक असतील.