स्थैर्य, वावरहिरे, दि.२३: माण तालुक्यातील ६१ग्रामपंचायतीपैकी१४ ग्रामपंचायती बिनविरोध होवुन ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या तरी, आता सरपंच कोण होणार हे अद्याप गुलदस्त्यातच राहिले. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता सरपंचपद सोडतीकडे लागल्या आहेत.काल तालुक्यातील ४७ गावच्या निवडणुकीसाठी मतमोजणी झाल्यानंतर निकाल झाल्यावर गावागावात विजयी उमेदवार व समर्थकांनी जल्लोष केला.सत्तांतरात अनेकांनी बाजी मारली असली तरी आता सरपंच कोणाचा होणार?याची उत्सुकता आणि धाकधुक वाढली.निवडुन आलेल्या उमेदवारापैकी सर्वांनाच सरपंच पदाची आस लागली असल्याने पॅनलप्रमुखाची माञ कसोटी लागणार आहे.तर काही ठिकाणी सरपंचपदासाठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे.एकुणच तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राहावे यासाठी आरक्षणानंतर फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार आहे.काही ठिकाणी सत्ता एका गटाची आणि सरपंच दुसर्या गटाचा अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे विजयी उमेदवारापैकी एकाला संधी मिळावी व आरक्षण तसेच पडावे यासाठी बहुतांक्ष जणांनी देवाकडे प्रार्थना केली आहे.