स्थैर्य, मुंबई, दि.२०: दिवाळीनंतर कोरोनाचा पुन्हा
उद्रेक पुन्हा झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.
सोमवारपासून (23 नोव्हेंबर) मुंबई महापालिका क्षेत्रातील एकही शाळा सुरू
होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व
सरकारी, खासगी शाळा बंदच राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त
इक्बाल चहल यांनी दिली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय
म्हणून बृह्नमुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला.
राज्यामध्ये
23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र मुंबईसह
राज्यातील कोरोनाचा धोका अजूनही कमी झालेला नाही. सर्व दैनंदिन व्यवहार
नेहमीप्रमाणे सुरू झाले आहेत. रस्त्यांवरील गर्दीही वाढत आहे. त्यामुळे
कोरोनाचा धोका जास्त वाढला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येतही वाढ होताना दिसत
आहे. मुंबईतही करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बृह्नमुंबई महापालिकेने
आपल्या हद्दीतील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे
आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. यामुळे येथील शाळा
थेट पुढच्या वर्षी म्हणजेच 31 डिसेंबरनंतरच उघडणार आहेत.
मार्च
महिन्यापासून राज्यातली शाळा कॉलेज हे बंद आहेत. सर्व काही ऑनलाइन सुरू
आहे. लॉकडाऊननंतर सर्व व्यवहार हळुहळू पूर्वपदावर आले आहेत. दरम्यान
दिवाळीची गर्दी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे पुन्हा कोरोनाची दुसरी
लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा 31
डिसेंबरनंतर सुरू करण्यात निर्णय घेण्यात आला आहे.