गोंदवल्यात ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी


 


स्थैर्य, गोंदवले (जि. सातारा), दि.२० : अनेक महिन्यांपासून गुरुमाउलीच्या
भेटीसाठी आसूसलेले भक्तगण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधीचे दर्शन
घेत आहेत. शिस्तीचा वारसा जपत समाधी मंदिर समितीने केलेल्या उपाययोजनांमुळे
भाविक सुखावले असून, भाविकांची संख्याही आता वाढू लागली आहे. मंदिरात
निवास व महाप्रसादाची सोय अद्यापही बंदच आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठ महिन्यानंतर गोंदवल्यातील श्री ब्रह्मचैतन्य
महाराज समाधी मंदिरही भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. समाधी मंदिर समितीने
केलेल्या नियोजनाप्रमाणे सकाळी नऊ वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिरात
प्रवेश दिला जात आहे. प्रवेशदारातच प्रत्येकाच्या हाती सॅनिटायजर देऊन
थर्मोगणच्या साह्याने तपासणी करण्यात येत आहे. सामाजिक अंतर ठेऊन दक्षिण
दरवाजातून मुख्य मंदिरात प्रवेश करून समाधी दर्शनाची सोय करण्यात आली असून,
उत्तर दरवाजातून मंदिरातून बाहेर जाण्याची सोय आहे. 

नेहमीप्रमाणे मंदिर व परिसरात भाविकांना थांबण्यास अजूनही बंदीच आहे.
भाविकांच्या सोयीसाठी देणगी विभाग व पुस्तक विभाग तात्पुरते मंदिरासमोरच्या
इमारतीत सुरू करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दर्शनबारीमध्ये
सामाजिक अंतरासाठी गोल खुणा करण्यात आल्या आहेत. दीपावलीच्या सुट्ट्या
संपल्याने व शाळा सुरू होणार असल्याने भाविकांची संख्या वाढत असल्याचे दिसत
आहे. दरम्यान, समाधी मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याने परिसरातील दुकाने
सुरू करण्यात आली; परंतु सातारा-लातूर महामार्गाच्या कामासाठी रस्ता
खोदल्याने अडचण निर्माण होत आहे. अगदी मोजकीच दुकाने सुरू असली, तरी
भाविकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचेच दिसत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!