स्थैर्य, फलटण, दि. ०१ : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट 150 रुपये करण्यात येणार आहे, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करुन 4500 रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 500 रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे हि प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.
आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 250, 300 आणि 400 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 350, 450, 550 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 150, 200 आणि 300 असे दर आता निश्चित करण्यात आलेले आहेत, असेही प्रांताधिकारी जगताप यांनी स्पष्ट केले.