आता फलटण तालुक्यासाठी मी मोकळा; गद्दारांना क्षमा नाही : रणजितसिंह


दैनिक स्थैर्य | दि. 06 जुन 2024 | उपळवे | सोपानराव जाधव | माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले आहे; त्यांच्यासोबत यापुढे सुद्धा कायम मी कार्यरत राहणार आहे. राज्यामध्ये व देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे व भारतीय जनता पार्टीचेच सरकार राहणार आहे. त्यामुळे कुणीही कसलीही चिंता करण्याची कारण नाही. खासदार असताना पूर्ण मतदारसंघाचा विचार करावा लागत होता. परंतु आता मी फलटण तालुक्यासाठी पूर्णवेळ मोकळा आहे. ज्यांनी माझ्यासोबत गद्दारी केली त्यांना कधीही क्षमा करणार नाही; असे मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

सुरवडी येथील हॉटेल निसर्ग येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, समशेरसिंह नाईक निंबाळकर, ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अनुप शहा, युवा नेते रणजितसिंह भोसले, फलटण विधानसभा प्रभारी सचिन कांबळे – पाटील, युवा नेते सुशांत निंबाळकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

बारामतीला पुन्हा पाणी देण्यासाठीच राजे गटाची तालुक्यासोबत गद्दारी; परंतु ते मी घडू देणार नाही.

गेल्या काही वर्षांपासून फलटणच्या राजे गटाकडे कोणतेही पद नाही. राज्यामध्ये आगामी काळामध्ये पुन्हा एकदा पद मिळवण्यासाठी फलटण, माण व सांगोला तालुक्याचे हक्काचे असलेले पाणी पुन्हा एकदा बारामतीला देवून आपल्या पदरात पद पाडून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राजे गट करत आहे. परंतु फलटणचे हक्काचे पाणी मी बारामतीला कदापी जावू देणार नाही. त्यासाठी काहीही संघर्ष करावा लागला तरी त्यासाठी मी तयार आहे; असेही मत रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केले.

फलटण विधानसभेतून भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणणार

आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आमदार म्हणून निवडून जाण्यासाठी मी आता पूर्ण वेळ कार्यरत राहणार आहे. खासदार म्हणून कार्यरत असताना पूर्ण मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर होती. परंतु येणाऱ्या काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये लक्ष देऊन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विधानसभेवर निवडून जाण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित काम करायचे आहे; असेही मत यावेळी रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.

फलटणच्या जनतेचे प्रेम कधीही विसरणार नाही; तालुक्याचा आशीर्वाद माझ्यासोबत

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून मला तब्बल 17000 मतांचे मताधिक्य आहे. फलटणचा सुपुत्र म्हणून फलटण तालुक्यातील जनतेने माझ्यावर जे प्रेम केलेले आहे; ते कधीही विसरणार नाही. आगामी काळात फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी पूर्णवेळ कार्यरत राहणार आहे. फलटण तालुक्यामधील प्रत्येक वाडीवस्तीवर जाऊन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक नवीन फळी तयार करणार आहे. यासाठीच आगामी काळात मी कार्यरत राहणार आहे; असेही यावी रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांनो फक्त दोन महिने वाट बघा!

देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये आपण कार्यरत राहणार आहोत. आपल्या कार्यकर्त्यांनी मनामध्ये कोणताही शंका न आणता तळागळात काम करावे आणि फक्त दोन महिने वाट बघा; तुम्हाला नक्कीच चांगली बातमी मिळेल. माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवताना मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला मी सांगितले होते की; जी कोणी उमेदवार असेल त्याचा प्रचार करण्यास मी तयार आहे. परंतु इतर उमेदवारांच्यावर भाजपा नेत्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे मला पुन्हा उमेदवारी घोषित केली होती. आपल्या कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावे; असे मत यावेळी रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.

यावेळी विविध मान्यवर नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली आहेत.


Back to top button
Don`t copy text!