आता मराठा महिला राज्याची मुख्यमंत्री व्हावी; पवारांच्या उपस्थितीत भाजप नेत्याचे वक्तव्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, मुंबई, दि.२१: महाराष्ट्राच्या इतिहासात कर्तृत्ववान मराठा स्त्रिया बऱ्याच झाल्या, पण राज्याची महिला मुख्यमंत्री झालेली नाही. म्हणून मराठा महिला राज्याची मुख्यमंत्री व्हावी, अशी इच्छा भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी येथे एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत व्यक्त केली आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींचे कान टवकारले गेले. शेलार यांच्या या वक्तव्याचे आता अनेक तर्क काढले जात आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी पत्रकार विजय चोरमारे यांच्या “कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या संपादित पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला आमदार अॅड. आशिष शेलार आणि चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

समाजाला आत्मभानाची गरज

वऱ्हाडासारख्या भागातून सत्यशोधक चळवळींमुळे मराठा समाजातून ताराबाई शिंदेंसारखी बंडखोर महिला पुढे आल्याचा दाखला या वेळी शरद पवार यांनी दिला. ज्ञानाचा व कर्तृत्वाचा मक्ता पुण्या- मुंबईकरांकडे नाही, असे ते म्हणाले.

मराठा स्त्रिया आज सत्संग व हळदी कुंकवात अडकल्या असून मराठा समाजाला आत्मभान येण्यासाठी अशा पुस्तकाची गरज असल्याचे पत्रकार ज्ञानेश महाराव म्हणाले.

… अन् लावले जाऊ लागले कयास

भाजपचे राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार स्थापण्याचे प्रयत्न संपलेले नाहीत. देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होऊ नयेत, असे अनेक भाजप नेत्यांना वाटते. शिवाय सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्यास अजित पवार आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काय, अशा प्रश्नांना शेलार यांच्या वक्तव्याने जागा करून दिल्याने विविध कयास लावले जात आहेत.

… कारण काय? 

शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष होते. गेल्या वेळी मुंबई पालिका निवडणुकीची धुरा त्यांच्याकडे होती. या वेळी ती अतुल भातखळकर यांच्याकडे आहे. मूळ कोकणातील अॅड. शेलार हे मुंबई महापालिकेतून पुढे आलेले नेते आहेत. ते फडणवीस विरोधी गटातील मानले जातात.

सुप्रिया सुळे यांच्याकडे रोख

अॅड. शेलार म्हणाले की, मराठा महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हायला हवी, त्याला मनापासून आमचे समर्थन असेल. शेलार यांच्या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!