दैनिक स्थैर्य | दि. 05 डिसेंबर 2023 | फलटण | तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना खताचे पैसे शेतकरी देत नाहीत व पंचायत समितीच्या माध्यमातून नूतन अवजारे मिळवून देतो म्हणून शहरातील अनेक खते, अवजारे विक्री व फायनान्स प्रतिनिधी यांच्यावर बाजार समितीच्या माध्यमातून कारवाई करून वेळ प्रसंगी गुन्हे दाखल करा; असे निर्देश बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
बाजार समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत रघुनाथराजे बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले की; फलटण शहर व तालुक्यातील कोणत्याही खते विक्री व अवजारे विक्री करणाऱ्या दुकानदारांनी आता अश्या पद्धतीने जर कामकाज करणार असतील तर त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल. जर या सर्व शेतकऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीने कामकाज केलेले सुधारले नाही तर दुकानदारांच्यासह संबंधित फायनान्स कंपनीवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येतील.
आगामी काही दिवसांत बाजार समितीमध्ये बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार समितीच्या आवारात बैठक आयोजित करण्यात येत आहे; तरी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे तर त्यांनी बाजार समितीकडे आपली तक्रार दाखल करावी; असे मत बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित शेतकरी प्रतिनिधी म्हणाले की; आम्ही खते विकर्त्यांकडून खते घेतली होती आणि खते घेतलेल्या रकमेच्या 10 ते 15 पट कर्ज आमच्या नावाने उचलले आहे. त्यामुळे आमचे बँकिंग रेकॉर्ड सुद्धा खराब झाले आहे.