काशीळ येथे दोन एसटी बसच्या अपघातात नऊ जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.८: पुणे- बेंगलोर महामार्गावर शिवराजनगर(काशीळ,ता.सातारा) येथे बंद पडलेल्या एसटी बसला पाठीमागून आलेल्या दुसऱ्या एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका वाहकासह नऊ प्रवासी जखमी झाले.गुरुवारी दुपारी हा अपघात झाला.या अपघाताची फिर्याद प्रकाश तुकाराम डिसले (सांगली आगार बसचालक,रा.वसगडे, ता.पलूस,जि. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
         याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगली आगाराची सातारा ते सांगली जाणारी बस गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास महामार्गावर शिवराजनगर (काशीळ) येथे बंद पडल्याने चालकाने बस महामार्गालगत बाजूला उभी केली होती.या नादुरुस्त बसला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या एसटी बसने धडक दिली.
         या अपघातात स्वारगेट- कोल्हापूर बसचा वाहक दगडू वसंत मुगदल (वय.५२,रा.वडनगे,ता.करवीर.जि. कोल्हापूर) यांच्यासह त्यातील प्रवाशी शुभम दगडू मुगदल (वय.२०), वैशाली दगडू मुगदल (वय.४४,दोघे रा.वडगणे, ता.करवीर,जि. कोल्हापूर),संदीप कागले (वय.४८),तुषार संतोष कागले (वय.२१) कोमल संतोष कागले (वय.२३)शारदा संतोष कागले (वय.४७),आदित्य संतोष कागले (वय १७,सर्व रा.सेवाधाननगर चिथोड,जि. धुळे),संगीता संतोष पोतदार (वय.३८,रा.मलकापूर,कराड) हे गंभीर व किरकोळ जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच सपोनि डॉ.सागर वाघ,हवालदार सुनील जाधव,मनोहर सुर्वे,किरण निकम यानी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने उपचारासाठी कराड येथे पाठवले.अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून स्वारगेट- कोल्हापूर बसचालक अजित मारुती पाटील (रा.तीटवे,राधानगरी,कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हवालदार मनोहर सुर्वे व किरण निकम करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!