दैनिक स्थैर्य । दि. ०९ जानेवारी २०२३ । फलटण । निंभोरे, ता. फलटणचे रहिवासी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोकसभेत निवडून गेल्या पासून संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघात केलेल्या विकास कामामुळे निंभोरे गावाचे नाव मोठे झाले असून सर्व दूर पोहोचले आहे, आता त्यांना केंद्रात मंत्री करुन आमच्या गावाचे नाव आणखी मोठे करण्याची संधी द्या अशी मागणी निंभोरे ग्रामस्थांनी केली आहे.
भारतीय जनता पार्टी लोकसभा प्रवास योजनेंतर्गत मिशन २०२४ ची सुरवात नुकतीच करण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आळंदी – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी निंभोरे, ता. फलटण येथे केली. त्यावेळी निंभोरे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आणि वरीलप्रमाणे मागणी करण्यात आली. त्यावेळी मंत्री महोदया समवेत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्य प्रवास संयोजक माजी मंत्री बाळा भेगडे, लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, बजरंग गावडे आणि निंभोरे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
निंभोरे ग्रामस्थांच्यावतीने अमित रणवरे, शिवाजीराव जाधव, बाळासाहेब मोहिते, धीरज कांबळे, व्यंकट भंडलकर, हंबीर रणवरे, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा कांबळे, किशोर मोरे यांनी ना. मिश्रा यांचे स्वागत व सत्कार केला.