निंबळकमध्ये दुग्ध व्यवसायाच्या मार्गदर्शन केंद्रासाठी रामसाहेब निंबाळकर देणार दोन एकर जागा

आधुनिक दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी निंबळक येथे मार्गदर्शन केंद्र उभारणार. यासाठी उद्योजक रामसाहेब निंबाळकर यांनी दोन एकर जागा व आवश्यक सुविधा देण्याची मोठी घोषणा केली आहे.

स्थैर्य, निंबळक, दि. 29 जून : आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या राहुल सस्ते यांचा पंजाब अभ्यास दौऱ्यावरून परतल्यानंतर उद्योजक रामसाहेब निंबाळकर यांनी सत्कार केला. यावेळी निंबळक येथील तरुणांना दुग्ध व्यवसायाचे मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःची दोन एकर जागा आणि इतर सुविधा स्वखर्चाने उपलब्ध करून देण्याची घोषणा रामसाहेब निंबाळकर यांनी केली.

आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाच्या प्रगतीबरोबरच इतरांनाही प्रवृत्त करण्याचे काम सस्ते कुटुंबाकडून होत आहे. यामुळे हे कुटुंब कौतुकास पात्र असल्याचे रामसाहेब निंबाळकर म्हणाले. निंबळक येथील रामसाहेब निंबाळकर यांच्या “रामालय” निवासस्थानी हा सत्कार करण्यात आला. दुग्ध व्यवसायातील नवनवीन प्रयोग आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यासाठी निंबळक येथील तरुणांना मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. यासाठी स्वतःची दोन एकर जागा, कंपाऊंड, पाण्याची सोय आणि इतर सुविधा ते स्वखर्चाने देणार आहेत. या जागेत राहुल सस्ते यांनी आदर्श मार्गदर्शन केंद्र उभारावे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी राहुल सस्ते म्हणाले की, गोविंद डेअरीच्या माध्यमातून पंजाब अभ्यास दौऱ्यात मुरघास कसा बनवायचा आणि मक्याची कापणी कोणत्या टप्प्यावर करायची, याची सविस्तर माहिती मिळाली. पंजाबमधील गायी दिवसाला सरासरी ४० लिटर, तर सर्वाधिक दूध देणारी गाय ७० लिटरपर्यंत दूध देते. तिथले गोठ्यांचे नियोजन अत्यंत अचूक असते. या तुलनेत आपण दुग्ध व्यवसायात वीस वर्षे मागे आहोत.

महाराष्ट्रात गायींचे सरासरी दूध १५ ते २३ लिटर असून, सर्वाधिक दूध ३० ते ३५ लिटरपर्यंत मिळते. हा फरक भरून काढण्यासाठी पंजाबसारखे नियोजन करणे गरजेचे आहे. या दौऱ्यासाठी गोविंद डेअरीचे डॉ. गायकवाड, डॉ. चव्हाण आणि डॉ. पवार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याचे सांगत राहुल सस्ते यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Back to top button
Don`t copy text!