स्थैर्य, फलटण, दि.२१: फलटण तालुक्यात ८० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकांची रणधुमाळी सुरु झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या इच्छुक व समर्थकांच्या मेळाव्यास लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हेच संकेत देऊन गेल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
फलटण तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायती राष्ट्रवादी (राजेगट) कडे असून आज तालुक्यातील सर्व ८० ग्रामपंचायतीमधील इच्छुक व त्यांच्या समर्थकांचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसने अनंत मंगल कार्यालयात आयोजित करुन प्राथमिक स्वरुपात सर्वांची मते जाणून घेतली. महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, उपसभापती सौ. रेखा खरात, जिल्हा परिषद/पंचायत समिती आजी माजी पदाधिकारी, सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायती बरखास्त करुन तेथे प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व ८० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया प्रशासन स्तरावर सुरु झाली असून दि. २३ ते ३० डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे.
राष्ट्रवादीच्या या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, सकाळच्या सत्रात ७ आणि दुपारच्या सत्रात उर्वरित ७ पंचायत समिती गणनिहाय बैठका घेऊन श्रीमंत रामराजे व अन्य मान्यवरांनी इच्छुक व त्यांचे समर्थक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांची मते समजावून घेतली.
इच्छुकांनी आपण कसे सक्षम आहोत हे सांगून आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही मागणी केली तर त्यांच्या समर्थकांनी या उमेदवाराला पाठींबा कसा मिळेल हे सांगताना उमेदवारी मिळाल्यास हाच उमेदवार कसा निवडून येईल याची गणिते नेत्यांसमोर ठेवली.
ग्रामपंचायत स्तरावरील नेते, कार्यकर्ते, त्या भागातील आजी माजी जिल्हा परिषद/पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांची मतेही यावेळी समजावून घेण्यात आली.
दरम्यान निवडणूक कार्यक्रम, उमेदवारी अर्ज भरताना घ्यावयाची दक्षता, उमेदवारी अर्जासोबत जोडावयाचे दाखले व कागदपत्र याबाबत माहिती देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था मेळाव्याच्या ठिकाणी करण्यात आली होती.
निवडणूक आयोग व शासनाने सरपंच आरक्षण निश्चित न करता त्याबाबत निवडणूक मतदान पार पडल्यानंतर निर्णय होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने निवडणूकीतील चुरस एकीकडे कमी झाली असली तरी संभाव्य आरक्षण लक्षात घेऊन त्याप्रमाणे सरपंच पदासाठी सक्षम उमेदवारांची निवड आताच करुन त्यानुसार संबंधीत १/२ प्रभागात त्यादृष्टीने उमेदवार निवड करावी लागणार असल्याने नेत्यांनाही ती एक डोकेदुखी होऊन बसली आहे.