
स्थैर्य, फलटण, दि. १६ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (खासदार गट) शहराध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक १३ मधील लोकप्रिय उमेदवार राहुल निंबाळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्याकडे त्यांनी हा अर्ज अधिकृतरीत्या सुपूर्द केला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल निंबाळकर यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी प्रशासकीय पातळीवर निवडणूक प्रक्रियेची चोख व्यवस्था करण्यात आली होती. अर्ज सादर करताना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव आणि मुख्याधिकारी निखिल मोरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये गेल्या काही वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर आणि जनसंपर्काच्या बळावर राहुल निंबाळकर यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. “सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आमचे मुख्य ध्येय आहे,” अशी भावना अर्ज भरल्यानंतर निंबाळकर यांनी व्यक्त केली. त्यांच्या या उमेदवारीमुळे प्रभागातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अर्ज भरण्याच्या वेळी राहुल निंबाळकर यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून सोडला होता. तरुणांचा उत्साह आणि ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद सोबत घेऊन आपण ही निवडणूक लढवत असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारताना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून प्रक्रिया पूर्ण केली. या निमित्ताने आता प्रभाग १३ मध्ये खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फुटला असून, पुढील काळात चुरस वाढणार असल्याचे चित्र आहे.

