स्थैर्य, कोरेगाव, दि. १७ : लोणंद, ता. खंडाळा येथील भारत गिअर्स कंपनीमध्ये कामगारांची होणारी गळचेपी रोखण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने न्यायालयात धाव घेतली आहे. कंपनीने कामगारांवर अन्याय करण्याची भूमिका घेतल्याने कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना न्याय मिळवून देण्याची भूमिका युनियनची आहे, अशी माहिती अध्यक्ष तेजस शिंदे व सरचिटणीस विठ्ठलराव गोळे यांनी दिली.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की खंडाळा तालुक्याच्या औद्योगिक पट्ट्यात लोणंद येथे असलेल्या भारत गिअर्स या कंपनीतील कामगारांनी एकत्रित येऊन आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनची स्थापना केली. कामगारांवर अन्याय करण्याची भूमिका कंपनी व्यवस्थापनाची असल्याने आ. शिंदे यांनी स्वत: लक्ष घातले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अद्यादेश काढून औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना संरक्षण दिले असताना देखील, या अद्यादेशाचा सरळ सरळ भंग करत कंपनी व्यवस्थापनाने ट्रेनी कामगारांचा कालावधी संपुष्टात आला असल्याचे कारण देत, बनावट सह्यांच्या आधारे कामगारांना कामावरुन काढून टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे. या कंपनीमध्ये यापूर्वी कार्यरत असलेल्या संघटनेमध्ये दहा कामगारांची सुरु असलेली चौकशी कोरोनाच्या कालावधीमध्ये कंपनीने एकतर्फी केल्याचा आरोप राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने केला आहे. या चौकशीच्या विरोधात सातारा औद्योगिक न्यायालयामध्ये फेरचौकशी करण्याचा मागणी केली आहे. ट्रेनी कामगारांबरोबरच कंपनीने अन्य कामगारांवर अन्यायाची भूमिका कायम ठेवली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी कंपनीच्या स्थापनेपासून कामगारांना बोनस दिला नसल्याने, युनियनने सहायक कामगार आयुक्तांकडे धाव घेतली आहे.
राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनमुळे आपल्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचे लक्षात येताच, कंपनीने आपल्या मुख्य शाखेत राबविलेल्या पॅटर्नप्रमाणे काही कामगारांना हाताशी धरुन, अमिषे दाखवून कामगारांमध्ये फूट पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी कामगारांना विचलीत न होता, एकजूट कायम ठेवण्यास सांगितले असून, युनियनने कामगार हितासाठी स्पष्ट भूमिका घेतली असल्याचे सांगितले आहे.
कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या सातारा दौर्यात आ. शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कंपनीतील कामगार कृष्णात माने व शुभम दरेकर यांनी सविस्तर निवेदन सादर केले आहे. भारत गिअर कंपनीतील कामगारांवर अन्याय होणार नाही, याबाबत दक्षता घेतली जाईल आणि संबंधित अधिकार्यांना तातडीने सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही मंत्री वळसे-पाटील यांनी दिली आहे. आ. शशिकांत शिंदे हे लवकरच कंपनीमध्ये जाऊन कामगारांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती विठ्ठलराव गोळे यांनी दिली.