दैनिक स्थैर्य । दि. ०३ जुलै २०२३ । सोलापूर । कबड्डी मधील उत्कृष्ठ चढाईपटू म्हणून संपूर्ण देशात ओळख निर्माण केलेले सोलापूरचे सुपुत्र राष्ट्रीय कबड्डीपटू गुरप्पा रेणसिध्दप्पा पारशेट्टी यांचे शनिवार दि. 1 जुलै रोजी सायंकाळी निधन झाले. ते 83 वर्षाचे होते.
सोलापूरच्या जयभवानी तरूण मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले गुरप्पा पारशेट्टी यांनी जय भवानी तरूण मंडळाच्या कबड्डी संघाचे नेतृत्व केले आहे.माजी आमदार बाबुराव चाकोते आणि माजी महापौर यल्लप्पा जेनुरे यांच्या मुशीत तयार झालेले पारशेट्टी यांनी महाराष्ट्र कबड्डी संघाचे अनेकदा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या कबड्डी खेळामुळे जय भवानी तरूण मंडळाला अनेक सुवर्ण पदके मिळालेली आहेत. मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत एकाच वेळी सात खेळाडूंना बाद करणारे गुरप्पा पारशेट्टी यांचा हा विक्रम आजपर्यत कोणत्याच खेळाडूंनी मोडलेला नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समोर त्यांनी कबड्डी स्पर्धेत चांगले यश मिळवले होते. कबड्डी मधून नावलौकीक मिळवलेले पारशेट्टी यांना पाहण्यास त्याकाळी अनेक ठिकाणी गर्दी होत होती. सोलापूर महानगर पालिकेत ते तब्बल 32 वर्ष लिपिक म्हणून सेवा बजावले. निवृत्त होताना त्यांना वरिष्ठ लिपिक या पदावर बढती देण्यात आली होती. अशा या नामवंत कबड्डीपटूचे निधन शनिवार दि. 1 जुलै रोजी सायंकाळी झाले त्यांची अंत्ययात्रा शेळगी येथील त्यांच्या राहत्या घरातून रविवारी सकाळी निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली असा परिवार आहे.