राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थीकेंद्रित – डॉ. अनिल पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ जुलै २०२४ | फलटण |
नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देणारे असून शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांमधील गुण विकसित करण्यासाठी विविध विषय निवडीची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणारे आहे, असे प्रतिपादन डॉ. अनिल पाटील यांनी केले.

फलटण एज्युकेशन सोसायटी व मुधोजी महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणावर आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

कार्यशाळेच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी श्रीमंत संजीवराजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरण केवळ विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवणारे नसून त्यांच्या विविध क्षमता विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अनुभवावर आधारित अध्यापन पद्धती, गटचर्चा, क्षमता अभिवृद्धी, याबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी आंतरविद्याशाखीय विषयांची निवड करण्याची संधी देणारे असल्याचे नमूद केले.

प्रारंभी त्यांनी श्रीमंत मालोजीराजे आणि कर्मवीर अण्णा यांच्यातील शिक्षणाविषयाचा दृष्टिकोन व फलटण संस्थानने रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये केलेली मदत याबाबतच्या काही बाबी उद्धृत केल्या. त्यांनी पुढे बोलताना या धोरणाचा सर्वांगीण आढावा घेतला व विविध शैक्षणिक स्तरांची माहिती दिली.

इयत्ता नववी ते बारावी स्तरावर एक ते चार लेवल, तर त्यापुढे उच्च शिक्षणामध्ये ७ लेवल पर्यंत विद्यार्थ्यांना क्षमता आधारित आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करता येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सक्तीच्या विषयांऐवजी आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार आवडी निवडीनुसार विषयांची निवड करता येणार आहे. त्यामुळे हे धोरण विद्यार्थीकेंद्रित व उपयुक्ततावादी असल्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये केले. शिक्षणामध्ये होणारे नवीन बदल, नवीन तंत्रज्ञान, नवीन अध्यापन पद्धती प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार असल्याचा उहापोह केला.

विद्यार्थ्यांना या पद्धतीमध्ये गुणांऐवजी क्रेडिट दिले जाणार असून अभ्यासाबरोबरच अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर उपक्रमामध्ये घेतलेल्या सहभागांची सुद्धा क्रेडिटद्वारे गुणवत्तेमध्ये मोजमाप होणार आहे. या शिक्षण पद्धतीमध्ये अध्यापकांचे अध्यापनाचे काम प्रत्यक्षरीत्या कमी असेल तर आंतरविद्याशाखीय विषयाद्वारे व गटचर्चेद्वारे विद्यार्थ्यांच्या सहभागातून जास्तीत जास्त असणार आहे. या धोरणामध्ये पारंपरिक शिक्षणामध्ये असणारे दोष दूर होणारा असून विद्यार्थ्यांना हवे तेव्हा शिक्षण प्रक्रियेतून बाहेर पडता येईल व गरज वाटल्यास पुन्हा प्रवेश घेता येईल. कोणत्याही इयत्तेतून बाहेर पडताना त्याच्या शिक्षणाची त्याला उपयुक्तता राहील. अशाप्रकारे प्रमाणपत्र पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी अशा पद्धतीने त्याला पर्याय उपलब्ध असणार आहेत. तसेच विविध प्रकारचे प्रशिक्षण संशोधन याचाही त्यामध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे ही शिक्षणपद्धती अधिक व्यापक, अधिक व्यावहारिक व अधिक उपयुक्ततावादी आहे, असे सांगितले.

एकूणच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आज कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोचा वापर हा विविध क्षेत्रांमध्ये केला जाणार आहे की, ज्यामुळे नजीकच्या काळामध्ये काही अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होणार आहेत. अर्थात त्यासाठी शिक्षणक्षेत्रात येऊ घातलेले हे नवीन बदल स्वीकारण्यासाठी संस्थाचालक, शाखाप्रमुख, शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वच घटकांनी हे समजून घेणे व त्यानुसार त्याला सामोरे जाणे आवश्यक असल्याचे दिसून येते.

प्रारंभी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी डॉक्टर अनिल पाटील यांचा परिचय करून दिला. डॉ. पाटील हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू असून त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये विद्याप्रबोधिनीच्या माध्यमातून गुरुकुल प्रकल्प, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, स्टार्टअप आणि संशोधन केंद्र हे उपक्रम राबवून शालेय व उच्च शिक्षणामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणणारे एक व्यासंगी शिक्षणतज्ज्ञ असल्याचे सांगितले. त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये केलेले बदल व त्याचा गुणवत्ता वाढीसाठी कसा उपयोग झाला, हे सांगत असताना या कार्याची दखल घेऊनच रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी त्यांनी सलग दोन टर्म काम केले व त्यामुळेच आज रयत शिक्षण संस्था ही एक ‘रयत विद्यापीठ’ नावाने क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन झालेली आहे, असे म्हटले.

अध्यक्षपदावरून बोलताना श्रीमंत रामराजे यांनी विविध संस्थांनी परस्परांना मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. ज्या संस्थांनी व काही शहरांमध्ये शिक्षणाचा विशेष पॅटर्न विकसित केलेला आहे, त्यांनी अन्य ठिकाणीही आपल्या विविध कल्पना राबवण्यास सहकार्य केल्यास शिक्षणासाठी एकाच ठिकाणी जे केंद्रीकरण होते, ते टाळता येईल व या शैक्षणिक धोरणाचा ग्रामीण विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल, असे सांगितले. तसेच कृत्रीम बुद्धिमत्तेच्या आधारे पुढे होणारे बदल स्वागतार्ह असतील, असे म्हटले.

या कार्यशाळेसाठी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांचे प्रमुख व शिक्षक प्रतिनिधी व काही विद्यार्थीही सहभागी झाली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वेळेकर यांनी केले तर आभार डॉ. ए. एन. शिंदे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!