स्थैर्य, फलटण दि.०९ : पेट्रोल, डिझेल, एल.पी.जी. गॅस च्या दरात होत असलेल्या दरवाढी विरोधात फलटण येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन केंद्र सरकारविरोधात निषेध नोंदवला. यावेळी फलटण शहरातील नामजोशी पेट्रोल पंप येथे फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निदर्शने करुन त्यानंतर तहसिलदार समीर यादव यांना आपले निवेदन सादर केले.
मोदी सरकार पेट्रोल,डिझेल वरील करामधून लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटत असल्याचा आरोप करीत युपीए सरकारच्या काळामध्ये पेट्रोलवर एक्साईज ड्युटी 9.48 रुपये होती ती आज 32.90 रुपये म्हणजे 258 % वाढ. डिझेलवरील एक्साईज ड्युटी 3.56 रुपये होती ती 31.80 रुपयांवर गेली आहे म्हणजे 820 % वाढ झाल्याचे निदर्शनास आणून देत त्यामुळे प्रचंड दरवाढीचा सामना शेतकरी व सर्वसामान्यांना करावा लागत असल्याचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी बेडके यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने 100 रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल 92 रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल 100 रुपये लिटर चा पुढे होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही 900 रुपये झाला असल्याचे तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष अमिरभाई शेख यांनी स्पष्ट केले आहे.
पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या 7 वर्षात तब्बल 20 ते 25 लाख कोटी रुपयांची लुटमारी केली आहे, तसेच 2001 ते 2014 या चौदा वर्षाच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर 1 रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता तो 2018 मध्ये 18 रु. प्रतिलिटर केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
.केंद्रात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरपेक्षा जास्त प्रती बॅरल असतानाही देशांतर्गत किमतीवर त्याचा परिमाण होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती याची आठवण यावेळी युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रीतम जगदाळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
शहरातील हिंदुस्तान पेट्रोलीयम कंपनीचे नामजोशी पेट्रोल पंपावर केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढी विरुद्ध कॉग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन करुन भाजप प्रणित केंद्र सरकार हटाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी हटाव अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलनानंतर कॉग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदार समीर यादव यांना निवेदन देण्यात आलेे. त्यावेळी फलटण तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी बेडके, कार्याध्यक्ष अमीरभाई शेख, उपाध्यक्ष अशोक शिंदे, ग्रामीण उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, जिल्हा सरचिटणीस शंकर लोखंडे, अनुसूचित जाती जमाती सेल जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ दैठणकर, शहर अध्यक्ष मोहीत बार्शीकर, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष ताजुभाई बागवान, शहराध्यक्ष अलताब पठाण, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पंकज पवार, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अजिंक्य कदम, शहराध्यक्ष प्रितम जगदाळे यांचेसह कॉग्रेसचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी, ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.