नाणार समर्थक थेट शरद पवारांची भेट घेणार, सुनील तटकरे मध्यस्थी करणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,रत्नागिरी,दि.२: नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाला दिवसेंदिवस समर्थन वाढत आहे. अनेक संघटना हा प्रकल्प राजापूरमध्येच व्हावा, यासाठी पुढे येत आहेत. दरम्यान प्रकल्प समर्थकांच्या रत्नागिरी आणि राजापुरातील एका संयुक्त शिष्टमंडळाने रोहा येथे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली.

या भेटीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी समर्थकांची भेट घडवून देण्याची मागणी करण्यात आली. येत्या काही दिवसांत अशी भेट मुंबई मुक्कामी घडवून देण्याचे अभिवचन खासदार सुनील तटकरे यांनी या शिष्टमंडळाला दिलं.

नाणार प्रकल्पासाठी राजापूरमधील 45 संघटना एकत्रित

खासदार सुनील तटकरे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात राजापुरातील रिफायनरी प्रकल्प समन्वय समितीचे सदस्य होते. रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाच्या लढ्याला सध्या मोठी गती मिळालीय. या प्रकल्पासाठी राजापूरमधील 45 संघटना एकत्रित आल्यात. तर रत्नागिरीतील देखील 50 संघटना एकवटल्या आहेत.

प्रकल्प समर्थक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवारांची भेट घेऊन बाजू मांडणार

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मिळावी यासाठी प्रकल्प समर्थक संघटनेकडून मुख्यमंत्री कार्यालयाला मेलही करण्यात आला आहे. मात्र अद्याप उत्तर आलेलं नाही. त्यामुळे प्रकल्प समर्थकांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

खासदार सुनील तटकरे यांची येत्या दोन दिवसांत दिल्लीत पवारांशी भेट होणार

रत्नागिरी दौऱ्यावर आलेले खासदार सुनील तटकरे यांनी प्रकल्प समर्थकांच्या खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी आपण दूवा बनू शकतो, असे वक्त्तव्य करून समर्थकांना दिलासा दिला होता. त्या अनुषंगाने रोहा सूतारवाडी येथील निवासस्थानी प्रकल्प समर्थकांच्या रत्नागिरी आणि राजापुरातील संयुक्त शिष्टमंडळाने खासदार तटकरे यांची भेट घेतली. या भेटीत खासदार तटकरे यांनी येत्या दोन दिवसांत आपली दिल्ली येथे पवार यांच्याशी भेट होणार असून, त्यांच्याशी चर्चा करून लवकरच मुंबईत समर्थकांची त्यांच्याशी भेट घडवून देण्याबाबत नियोजन केले जाईल, असे प्रकल्प समर्थकांना आश्वस्त केले.


Back to top button
Don`t copy text!