दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
नवरात्र महोत्सव मंडळ शंकर मार्केट रोड, फलटण या मंडळाच्या दुर्गामाता देवीची विसर्जन मिरवणूक काल पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. ही मिरवणूक ढोल-ताशा व भक्तिमय अशी दुर्गामाता यांची गाणी कुठल्याही नाच व धिंगाणाविरहित काढण्यात आली. मात्र, दुर्गामाता विसर्जनासाठी नीरा उजवा कालव्यात पाणी नसल्याने व नगरपालिका प्रशासनानेही विसर्जनाची कोणतीच सोय न केल्याने मंडळांची तारांबळ उडाली.
ही दुर्गामाता मिरवणूक शंकर मार्केट रोडवरून सुरू झाली. ती शंकर मार्केट येथे आली. मिरवणुकीत परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यांच्यासोबत मंडळाचे कार्यकर्ते होतेच. शंकर मार्केट येथून बाजारे शाळा मार्गे अहिरराव व खानविलकर यांच्या दारावरून तेली गल्ली व गजानन चौक येथे आली. तिथे मेहत्तर समाज (कामगार वसाहत) येथील मंडळ व लक्ष्मीनगर येथील मोती चौक तालीम नवरात्र उत्सव मंडळ या तीनही मंडळांच्या डिजेच्या आवाजाने महात्मा गांधी चौक दुमदुमला होता. राजवाडा चौक येथेही दुर्गामाता मिरवणूक तिन्ही मंडळांची तरुणाई डिजेच्या तालावर ताल धरून नाचत होती. या मोठ्या मंडळाच्या बाजूने मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
ही मिरवणूक शिवाजी वाचनालय, शिंपी गल्ली येथून वाजत गाजत नरसिंह चौक येथील तुळजापूरची देवी मंदिर येथे दुर्गामाताची पूजा केली व पुढे खंडोबा मंदिर येथून पुढे शिवशक्ती चौक पुढे मारूती मंदिर, रविवार पेठ येथे आली. त्यानंतर बारामती चौक येथे आली. तिथे समजले की, नीरा उजव्या कॅनॉलला पाणीच नाही व नगरपालिका यांनीसुध्दा दुर्गामाता विसर्जन करण्यासाठी सोय केली नव्हती. फलटण तालुक्यातील सर्वच दुर्गामाता उत्सव मंडळ यांनासुद्धा दुर्गामाता विसर्जन कुठे करायचे, याचा प्रश्न पडला होता. त्यानंतर मंडळाने सिमेंट रोड मार्गे पुन्हा शिंपी गल्ली येथे राजेश (गोटू) बोथेकर यांचा गणेशमूर्ती व दुर्गामाता मूर्ती तयार करण्याचा कारखाना आहे, तिथे देवीची मूर्ती काल रात्री ठेवली व दुसर्या दिवशी म्हणजे आज सकाळी ८ वाजता टेम्पोमध्ये नेऊन कुरवली येतील डॅम (छोटे धरण) तेथे दुर्गामाताची पूजा करून विसर्जन करण्यात आली.