दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचालित जनसेवा वाचनालय मागील महिन्यात चालू करण्यात आले आहे. या वाचनालयाचा फायदा लहान मुलांपासून तरुण मुलांना होण्यासाठी फलटण नगरपालिका शाळा क्र. ५, शाळा क्र. ७ आणि शाळा क्र. ९ (गोसावी वस्ती, जिंती नाका) येथील शाळेत जाऊन वाचनालयाच्या संचालकांनी मुलांशी संवाद साधला.
मुलांना वाचनालयातील पुस्तके वाचनास देण्यात आली. तसेच मुलांना मोफत वाचनालयाचे सभासद करून घेण्यात आले. तसेच शाळा क्र. ८ मधील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वाचनालयास भेट दिली. सर्व मुलांमध्ये वाचनाची तीव्र जिज्ञासा जाणवली. या शाळांमधील मुले-मुली अत्यंत हुशार आणि उत्साही आहेत. या नगरपालिका शाळेतील सर्वच शिक्षक अत्यंत तळमळीने मुलांना शिकवित आहेत, हे प्रकर्षाने जाणवले.
फलटण नगरपालिका शाळा क्र. ८ मधील विद्यार्थ्यांनी जेव्हा वाचनालयास भेट दिली, तेव्हा सुरूवातीस सर्वांपुढे गोष्टींची पुस्तके ठेवण्यात आली होती; परंतु वरील फोटोतील मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सुधा मूर्ती यांची पुस्तके मागून वाचनास घेतली. या मुलांमध्ये अवांतर वाचनाची गोडी जाणवली. फक्त त्यांना संधी हवी आहे. ती संधी जनसेवा वाचनालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.