
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यभरातील ३१ विभागांत २,७०० प्रवासी निवारे उभारण्याचे नियोजन असून, पहिल्या टप्प्यातील १,०५० निवाऱ्यांसाठी २१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २८ नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील ३१ विभागांत तब्बल २,७०० प्रवासी निवारा शेड उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात १४ विभागांतील १,०५० निवाऱ्यांसाठी २१० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण भागातील मार्गस्थ निवाऱ्यांची पडझड झाल्याने प्रवाशांना ऊन-पावसापासून संरक्षण देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही योजना हाती घेतली आहे.
पहिल्या टप्प्यातील नियोजन आणि निधीची तरतूद
पहिल्या टप्प्यात राज्यातील १४ विभागांमध्ये प्रत्येकी ७५ प्रवासी निवारे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक निवाऱ्यासाठी २० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, त्यानुसार २१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित निवाऱ्यांसाठी पुढील टप्प्यांत निधी मंजूर केला जाणार आहे.
सुसज्ज निवाऱ्याची रचना आणि सुविधा
प्रस्तावित निवारा शेडची लांबी ३० फूट आणि रुंदी आठ फूट असून, सुमारे २२.३ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या निवाऱ्यात प्रवाशांना बसण्याची व्यवस्था असेल. याशिवाय पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा आणि वीज व्यवस्थेसह इतर मूलभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.



