एमपीएससी परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार; हाय पॉवर टास्क फोर्सकडे तब्बल १८ हजार सूचना

पेपरफुटी रोखण्यासाठी अत्याधुनिक ई-क्वेश्चन बँक, निश्चित वेळापत्रक आणि तक्रार निवारण प्रणालीवर भर दिला जाणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १३ सप्टेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि गतीमान करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार ‘एक्झाम टास्क फोर्स’ने सुधारणांच्या दिशेने काम तीव्र केले आहे. स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी स्थापन झालेल्या या समितीकडे राज्यभरातून तब्बल १८ हजारांहून अधिक ई-मेल्सद्वारे सूचना प्राप्त झाल्या आहेत. अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील या टास्क फोर्सने पुण्यात प्रत्यक्ष संवाद साधून उमेदवारांच्या थेट सूचना नोंदवून घेतल्या आहेत.

‘झिरो लीक’साठी ई-क्वेश्चन बँक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान

परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि प्रश्नपत्रिका फुटीला पूर्णपणे आळा घालणे हे समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी केंद्र सरकारच्या ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’च्या (SSC) धर्तीवर ‘ई-क्वेश्चन बँक’ तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. प्रश्न तयार करणाऱ्या व्यक्तीलाही तो प्रश्न कोणत्या परीक्षेसाठी वापरला जाणार आहे हे समजणार नाही, अशी सुरक्षित रचना केली जाणार आहे. तसेच पुढील एक वर्ष परीक्षा ऑनलाईनऐवजी पारदर्शक ओएमआर (OMR) पद्धतीनेच घेतल्या जातील, असेही समितीने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांचा विचार

परीक्षेच्या नियमांमध्ये वारंवार बदल न करता किमान ५ ते ८ वर्षे निश्चित धोरण ठेवावे, वार्षिक वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे आणि सर्व परीक्षांसाठी ‘वन टाईम रजिस्ट्रेशन’ (OTR) प्रणाली असावी, अशा प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत. याशिवाय एकापेक्षा जास्त पदांवर निवड झालेल्या उमेदवारांसाठी ‘ऑप्टिंग आऊट’चा पर्याय, उत्तरतालिकांमधील त्रुटी निवारणासाठी केंद्रीकृत ऑनलाईन तक्रार पोर्टल आणि परीक्षा केंद्रांवर मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक पावले उचलणार आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!