स्थैर्य, सातारा, दि. ०४ : जनतेची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांना आदर्श मानून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा, असा मोलाचा सल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिला. उदयनराजे भोसले मित्र समुहाच्यावतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्जवल यश मिळवलेल्या तीस विद्यार्थ्यांचा ‘जलमंदिर पॅलेस’ या उदयनराजेंचे निवासस्थानी शनिवारी सत्कार करण्यात आला.
यावेळी उदयनराजे म्हणाले, “तुमच्या पालकांची पुण्याई आणि समाजाचे नशीब म्हणून पुढील प्रशासकीय नोकरीच्या माध्यमातून जनतेची अविरत सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. तुम्हाला काहीही समस्या-प्रश्न निर्माण झाले तर आम्ही सदैव सहकार्याकरिता तत्पर आहोत. समाजाची सेवा करण्याकरिता प्रशासकीय अधिकाऱ्यांना फार मोठी संधी आहे. खडतर परिश्रम करुन एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या आपण सर्वांनी आपल्या नोकरीच्या कार्यकाळात निरपेक्ष भावनेने कार्य करावे. जनतेची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपला आदर्श मानून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा.” लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लाखो परिक्षार्थींमधून तुमची निवड झाली हे तुमच्या प्रयत्नांना मिळालेले यश आहे, अशा शब्दांत त्यांनी या विद्यार्थ्यांची पाठ थोपटली.
जलमंदिर हे सर्व जनतेचे घर
सर्वसामान्य जनतेमुळे आमचे राजेपण आहे. त्यामुळे जनतेसह तुम्हा सर्वांना जलमंदिर सदैव खुले आहे, अशी भावनाही यावेळी उदयनराजेंनी व्यक्त केली. यावेळी एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आलेला प्रसाद चौगुले यांसह प्रगती कट्टे, चैतन्य कदम, श्वेता खाडे, राहुल गुरव या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा दिवस नेहमीच स्मरणात राहील, अशी सामुहिक भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.