
थेट WhatsApp वर मिळवा
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सूक्ष्म आणि लघुउद्योगांसाठी पर्यावरणीय परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २५ सप्टेंबर : राज्यातील सूक्ष्म आणि लघुउद्योजकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (MPCB) घ्यावी लागणारी पर्यावरणीय संमती मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. अधिसूचित औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांना आता स्वप्रमाणित अर्ज सादर केल्यानंतर आवश्यक संमती मिळाल्याचे गृहीत धरले जाणार आहे. ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’ला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रशासकीय विलंब टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
परवानग्यांचे एकत्रीकरण आणि सुधारित शुल्क
जलप्रदूषण आणि वायुप्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत आवश्यक असणाऱ्या संमतीसह विविध कचरा व्यवस्थापनाच्या परवानग्यांची प्रक्रिया आता एकत्रित करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सांडपाण्याच्या प्रमाणानुसार नवीन वार्षिक संमती शुल्क निश्चित करण्यात आले आहे. १० हजार लिटरपर्यंत सांडपाणी निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना ५ हजार रुपये, तर इतर प्रकल्पांना ७ हजार ५०० रुपये शुल्क लागू राहील.
आरोग्य संस्था आणि जनित्रांना सवलत
नवीन नियमांनुसार २५० किलोवॅटपर्यंतच्या डिझेल जनित्रांसाठी कोणतेही वार्षिक शुल्क आकारले जाणार नाही. २५० ते ५०० किलोवॅट क्षमतेसाठी १ हजार रुपये, ५०० किलोवॅट ते १ मेगावॅटसाठी २ हजार रुपये शुल्क राहील. यासोबतच शासकीय मालकीच्या सर्व आरोग्य संस्थांना संमती शुल्कातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालये आणि संशोधन संस्थांना भांडवली गुंतवणुकीच्या आधारे एकत्रित संमती दिली जाणार आहे.