

स्थैर्य, सातारा, दि. ५ जून : सातारा नगरपरिषदेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीची खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. लवकरच नगरपरिषदेचे कामकाज या नव्या इमारतीत सुरू होणार असून, त्यामुळे नागरिकांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे.
या पाहणीवेळी भोसले यांनी नवीन इमारतीतील विविध विभाग, नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधा आणि प्रशासकीय कामकाजासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती घेतली. नगरपरिषदेचे कामकाज अधिक सुसूत्र व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने ही नवी वास्तू महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी साताऱ्याचे उपनगराध्यक्ष दत्ता बनकर, नियोजन सभापती अशोक शेडगे आणि नगरसेवक मनोज शेंडे यांच्यासह इतर पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा नगरपरिषदेचे लवकरच या नव्या प्रशासकीय इमारतीत स्थलांतर होणार आहे. या स्थलांतरानंतर सर्व विभागांचे कामकाज एकाच छताखाली सुरू होईल. यामुळे सातारकरांना विविध शासकीय कामांसाठी एकाच ठिकाणी अधिक सुलभ आणि जलद सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
