स्थैर्य, फलटण दि.11 : माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयामध्ये सदिच्छा भेट घेवून त्यांना भारतीय सैन्यदलाच्या शौर्यावर आधारीत आकर्षक रेखाटलेल्या मोठ्या चित्राची प्रतिमा सप्रेम भेट दिली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी, सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकरही उपस्थित होत्या.
भारतीय सैन्यदलाच्या अभिमानास्पद कार्याचे दर्शन या भव्य प्रतिमेतून व्यक्त होत असल्याने खासदार रणजितदादांनी दिलेली ही आगळी – वेगळी भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष भावली.
यावेळी खासदार रणजितदादांनी माढा लोकसभा मतदार संघातील कृष्णा -भीमा स्थिरीकरण ,फलटण पंढरपूर रेल्वे, नीरा देवधर प्रकल्प, गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कटापूर), मतदारसंघातील तरुण, बेरोजगार युवकांना व्यवसायाच्या दृष्टीने मोठा प्रकल्प आदी कामांसंबंधीची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केल्यानंतर; ‘तुम्ही मला दिलेल्या भेटवस्तू पेक्षा मतदार संघातील दिलेल्या कामांची यादी मोठी आहे. तेच माझ्यावर ओझे आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी गंमतीने म्हणाले.
दरम्यान, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधानांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल व अनेक वर्ष रखडलेल्या प्रकल्पांना अंतिम रुप प्राप्त होईल, अशी भावना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर व्यक्त केली.