स्थैर्य, काठमांडू, दि ८: जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एवरेस्टच्या उंचीबाबत आश्चर्यचकीत करणारी बाब समोर आली आहे. चीन आणि नेपाळने मंगळवारी सांगितले की, माऊंट एव्हरेस्टच्या उंचीत एका मीटरचा फरक जाणवला आहे. माऊंट एव्हरेस्टची उंची आधी 8848 मीटर होती, आता 8848.86 मीटर झाली आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
चीन आणि नेपाळदरम्यान झाला करार
13 ऑक्टोबर 2019 ला नेपाळ आणि चीनदरम्यान माउंट एवरेस्टची उंची मोजण्याचा करार झाला होता. या अंतर्गत माउंट झूमलांगमा आणि सागरमाथाची उंची मोजण्याचे ठरले होते. माउंट एवरेस्टची उंची मोजण्यासाठी मागच्या वर्षी एक पथक शिखरावर रवाना करण्यात आले होते. तिकडे, तिब्बेटकडूनही यावर्षी एका पथकाला पाठवण्यात आले होते.
सर्वात आधी भारताने मोजली होती उंची
सर्वे ऑफ इंडियाने 1954 मध्ये माउंट एवरेस्टची उंची मोजली होती. तेव्हा याची उंची 8848 मीटर सांगण्यात आली होती. हिमालयावर रिसर्च करणाऱ्या अनेक संस्था आणि शास्त्रज्ञांनी यापूर्वी अनेकदा दावा केला आहे की, एव्हरेस्टच्या उंचीत बदल होत आहेत.
भूकंपामुळे उंची कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती
2015 साली नेपाळमध्ये झालेल्या तीव्र भूकंपानंतर माऊंट एव्हरेस्टची उंची 8,848 मीटर इतकी राहिली नसल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळेच नेपाळने जगाच्या सर्वोच्च शिखराची उंची मोजण्याची तयारी केली. यानंतर नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आज माउंट एव्हरेस्टची अधिकृत उंची 8848.86 मीटर जाहीर केली आहे.