वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल; मुसळधार पावसाचा अंदाज


दैनिक स्थैर्य | दि. ७ जून २०२४ | पुणे |
राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याने मान्सून ७-८ जून दरम्यान राज्यात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आता त्यापूर्वीच राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणासह, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

आता पुढील चार आठवडे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ६ जून ते १३ जून, १३ जून ते २० जून, २० जून ते २७ जून आणि २७ जून ते ४ जुलै अशा चार आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार १३ जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

शिवाय सध्या पुढील पाच दिवसांसाठी हवामान विभागाने राज्यातील जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांसाठी जिल्हास्तरीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या पाच दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यावेळी ताशी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजनुसार, मुंबई, पुणे, ठाणे, पालघर तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा सरी कोसळतील. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावासह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव तसेच इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे.


Back to top button
Don`t copy text!