दैनिक स्थैर्य | दि. 21 फेब्रुवारी 2024 | फलटण | आगामी काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे. यावेळच्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी चांगलीच मोर्चेबांधणी केली असल्याचे दिसत आहे. गतकाही महिन्यांपासून आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विजयसिंह मोहिते – पाटील हे ऍक्टिव्ह मोडवर आले असल्याचे संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघाने बघितले आहे. त्यामुळेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी “माढा लोकसभेसाठी; आमचं ठरलंय” टीम एकत्रित करत थेट विधानभवनात सुद्धा एकत्रित आल्याने संपूर्ण मतदारसंघात विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत.
काल दि. 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या विशेष अधिवेशनात मध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सर्व विरोधकांना एकत्रित करीत थेट विधान भवनामध्ये सुद्धा गेल्याने विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांचे सखोल चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार महादेव जानकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दीपक चव्हाण, आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील, आमदार राम सातपुते व युवा नेते धैर्यशील मोहिते – पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
माढा लोकसभा मतदार संघामधून आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते – पाटील यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळावी यासाठी मोहिते – पाटील कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत आहे. धैर्यशील मोहिते – पाटील यांनी अनेकदा आगामी येणाऱ्या माढा लोकसभा निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी; यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील हे सुद्धा ॲक्टिव मोडवर आलेले आहेत.
सन 2019 आली माढा लोकसभा मतदारसंघांमधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे लोकसभेवर निवडून गेले. त्यावेळी विजयसिंह मोहिते – पाटील यांनी संपूर्ण ताकतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी काम केले होते. परंतु त्यानंतर विविध घटनांमुळे मोहिते – पाटील व खासदार रणजितसिंह यांच्यामध्ये पूर्वीसारखे सख्य राहिले असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे खासदार रणजितसिंह यांच्या सर्व विरोधकांना एकत्रित करण्याचे काम मोहिते – पाटील करत असल्याची चर्चा माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरू आहे.
यासोबतच खासदार रणजितसिंह यांचे फलटण तालुक्यातील पारंपारिक विरोधक असलेले श्रीमंत रामराजे यांनी सुद्धा खासदार रणजितसिंह यांना आगामी खासदारकीचे महायुतीचे तिकीट न मिळवून देण्यासाठी फिल्डींग लावली आहे. श्रीमंत रामराजे हे त्यांचे बंधू तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे यांना महायुतीचे माढा लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी आग्रही आहेत. जरी श्रीमंत संजीवराजे यांना तिकीट मिळाले नाही तरी खासदार रणजितसिंह यांना पुन्हा तिकीट मिळू देणार नाही; असे श्रीमंत रामराजे यांनी जाहीर केले आहे.
या सर्व बाबींचा विचार करता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील व विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट न मिळू देण्यासाठी थेट मुंबईत वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डींग लावली जात असल्याचे व्यक्त केले जात आहे.