दैनिक स्थैर्य । दि.१६ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अकरा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत, उर्वरित जागेसाठी अटीतटीची निवडणूक होत असली तरी जावळी तालुक्यातील विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान संचालक व विधान परिषदेचे आ. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात भाजपचे जावळी -सातारचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी अर्ज ठेवला आहे. त्यामुळे आ. शिंदे यांच्या विजयाची भिस्त ही आ. भोसले यांच्यावर असल्याचेच सिध्द झाले आहे. या पूर्वी आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वडिल दिवंगत माजी मंत्री अभयसिह राजे भोसले आ शिंदे यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मदतीला धावून आले होते. आता आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्णयाकडे लक्ष वेधले गेले आहे. बावीस वर्षांपूर्वी जावळी दूध संघाच्या निवडणूकीनिमित्त जावळीच्या सहकार व राजकारणात आ. शिंदे यांनी प्रवेश केला, यश मिळाले की, आपल्या खास माणसांची सोय पहिली. काही जणांना मोठे केले. हे करीत असताना पक्षाची ताकद मिळाली की, कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ही यश मिळवून मंत्री पद लाभले. हे करीत असताना आपोआप राजकीय विरोधात उभे राहिलेले पद्धशीरपणे आडवे झाले. त्यामुळे कोरेगावचे आमदार व जावळीतील जिल्हा बँकेचे संचालक हे व्यवस्थित सुरळीत चालू होते. पण, मागील विधानसभा निवडणूकीत संदर्भ बदलून गेले. माथाडी नेते नरेंद्र पाटील,आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका म्हणून राजकीय विरोध करावा लागला. त्याची किंमत मोजावी लागली आहे. ती आज ही कायम राहिली आहे. असे मानण्यात येत आहे. सध्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूकी निमित्त आ. शिंदे यांना घेरले असल्याचा देखावा उभा केला जात असला तरी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कसबीवर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. मुळातच आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजप मध्ये दोघेही असून इच्छा नसतानाही खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे आता बँकेच्या पॅनलच्या चिन्हां सारखे कप बशी विभक्त करता येणार नाही. अशी अपेक्षा पॅनल मधुन व्यक्त केली जात आहे. मुळातच जावळीचे सुपुत्र असलेले ज्ञानदेव रांजणे यांच्या कडे ४९ पैकी किती मतदार आहेत? याची चाचपणी करायची असेल तर मतमोजणी होणे गरजेचे आहे. झाकली मूठ सव्वा लाख होऊ नये म्हणून ही निवडणूक होत आहे. अशी खाजगीत चर्चा सुरू आहे.
या निवडणुकीत कोणाला काय वाटते? हे महत्त्वाचे नसून कोण कोणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. हे पाहणे महत्वाचे आहे.निकालाबाबत केलेले भाष्य काळ्या दगडावरील रेघ पुन्हा पुसता येते. त्यामुळे तो शब्द वापरला म्हणून निकाल लागतो असे काही नाही. याचा अनुभव अनेकांना आहे,
सध्या जावळीच्या सहकार क्षेत्रात अंदाज बांधले जातात. पण, छातीठोकपणे पाठींबा देण्यास कोणी पुढे आले नाहीत. हीच मंडळी निकालानंतर विजयी संचालकाकडे गर्दी करून संधी साधून घेतील. हे सुध्दा खरे असले तरी झालेल्या मतदानातून जावळीच्या मैदानात भविष्यात रणकंदन घडू नये याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे असे जावळी तालुक्यातील शेतकरी वर्गाला वाटत आहे.आज जे काही सहल व पैशाचा बाजार भरतो आहे. त्याची सुरुवात हीच आता ओळख निर्माण झाली आहे. याची खंत वाटत असल्याची भावना जिल्हा बँक हितचिंतक करू लागले आहेत.