
दैनिक स्थैर्य । 9 मे 2025। सातारा । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गुरुवारी सायंकाळी सातार्यात दाखल झाले आहेत. त्याच्यासमवेत खा. निलेश लंके, खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचीही उपस्थिती असून सायंकाळी जिल्हा शासकीय विश्रामगृहात शरद पवार यांच्या उपस्थितीत खलबते झाली. शरद पवार यांनी पक्ष एकत्रिकरणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या शुक्रवारी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र येणार असल्याने राजकीय गोटातील उत्सुकता वाढली आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी शरद पवार आज सातार्यात आले. सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर खा. नीलेश लंके यांच्यासमवेत शरद पवार दाखल झाले. यावेळी खा. धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, सुनील माने, राजकुमार पाटील, शहाजी क्षीरसागर, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, विकास देशमुख, दीपक पवार, शफिक शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.
शासकीय विश्रामगृहात शरद पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकार्यांबरोबर खलबते झाली. शरद पवार यांनी जिल्ह्यातील विविध घटनांचा, पक्षीय घडामोडींचा आढावा घेतला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही यावेळी प्राथमिक चर्चा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शरद पवार यांच्या भेटीसाठी विश्रामगृहावर हजेरी लावली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर शरद पवार यांची साथ अनेकांनी सोडली. मात्र, शरद पवार यांच्याशी असणारे संबंध ते तोडू शकले नाहीत. याचा प्रत्यय गुरुवारी शासकीय विश्रामगृहात आला. एकेकाळी शरद पवार यांच्याबरोबर हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर आवर्जुन शरद पवार यांच्या स्वागताला उपस्थित होते. या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, शरद पवार यांनी सोळसकर यांच्याकडे नेहमीप्रमाणे स्मितहास्य करत त्यांचे स्वागत स्वीकारले.