दैनिक स्थैर्य | दि. २८ जुलै २०२३ | फलटण |
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार दि. २२ जुलै रोजी कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांनी स्वातंत्र्यसैनिक स्व. जनार्दन पुराणिक तथा आप्पा यांच्या कुटुंबियांची निगडी येथे घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली.
स्वातंत्र्यसैनिक जनार्दन पुराणिक यांनी ब्रिटिशांच्या विरोधात भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनात भूमिगत राहून कार्य केले, तुरूंगवास भोगला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय नि:स्वार्थीपणे कार्य केले. स्वातंत्र्यानंतरसुध्दा अनेक आंदोलनात भाग घेतला. या स्वातंत्र्यसैनिक जनार्दन पुराणिक आप्पांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची आ. महेश शिंदे यांनी भेट घेऊन आस्थेने चौकशी केली.
यावेळी संजय पुराणिक यांनी आ. महेश शिंदे यांचे मन:पूर्वक स्वागत केले. दिवंगत स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नी श्रीमती सुशिला पुराणिक यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून आ. शिंदे यांनी श्रीमती सुशीला पुराणिक यांचे आशिर्वाद घेतले.
संजय पुराणिक यांनी प्रकृती ठिक नसताना कार्यक्रमास ८४ वयाच्या आईसह पुणे येथून येऊन उपस्थित राहिलो, असे सांगून वडिलांच्या स्वातंत्र्यचळवळीतील योगदानाची माहिती दिली. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यानंतर निगडी गावात क्रांतिसिंह नाना पाटील अनेकवेळा आले. बैलगाडीतून नाना पाटलांची मिरवणूक काढली, ग्रामसफाई करण्यात आली. तसेच इंदिरा गांधींच्या अत्यंत जवळच्या मैत्रीण व अखिल भारत हरिजन सेवक संघाच्या अध्यक्षा स्व. निर्मलाताई देशपांडे (राज्यसभा सदस्या), किसन वीर (आबा), माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई तसेच बाळासाहेब भारदे, तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब तथा पी. के. सावंत, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष वि. स. पागे, विधान सभेचे उपाध्यक्ष मोरेश्वर टेंबुर्डे, हरिभाऊ निंबाळकर, कृष्णचंद्र भोईटे, एकसळचे दादासाहेब साखवळकर तर प्रत्येक गुरूवारी येत असत. स्व. दत्तोबा आण्णा बर्गे, तात्या बोराटे, राघुआण्णा लिमये, लोकसभेचे माजी अध्यक्ष मा. शिवराज पाटील, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह देशातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी निगडीत पदस्पर्श केला आहे.
यावेळी आ. महेश शिंदे म्हणाले की, आपल्या तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक जनार्दन पुराणिक थोर व्यक्ती होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात देशासाठी नि:स्वार्थीपणे महान कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा मला अभिमान वाटतो. त्यांच्या कार्याने भारावून गेलो. स्वातंत्र्यसैनिक स्व. जनार्दन पुराणिक यांच्या कुटुंबास काही अडचण आल्यास, मदत लागल्यास त्यांनी कधीही मला सांगावे, भेटावे नक्कीच सहकार्य करेन.
सदर कार्यक्रमासाठी कोरेगाचे नगराध्यक्ष, नगरसेवक श्री. बर्वे, निगडीतील ग्रामस्थ, आण्णासोा जगताप, संजय गायकवाड, प्रमोदराव बोरगे, भिमराव भोसले, जगदिश जगताप, सुरेश दिसले, दत्ता बोरगे, नामदेव जगताप, हणमंतराव जगताप, दिलीप पुराणिक यांच्यासह कोरेगावचे मान्यवर, सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. राहुल बर्गे, नगरसेवक सुनिल बर्गे, कोरेगावचे नवनियुक्त तहसीलदार संगमेश कोडे, नायब तहसीलदार कदम, तहसीलदार कार्यातील अव्वल कारकून श्रीमती आढाव मॅडम, संजय गांधी विभागाच्या श्रीमती अर्चना बुधावले, निगडीचे गावकामगार तलाठी श्रीमती संस्कृती खांडेकर, श्री. होनराव, विविध खात्यांचे शासकीय अधिकारी, कोरेगावचे मान्यवर ग्रामस्थ, त्याचप्रमाणे कोतवाल श्री. रमेश भोसले आणि समस्त पुराणिक कुटुंबीय उपस्थित होते.
एक आठवण…
देशाचे उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण निगडीत आले, तेव्हा पाऊस व चिखल होता. बरोबरचे अनेकजण म्हणत होते, साहेब गावात नको जायला, पाऊस आहे, चिखल आहे. मात्र, साहेबांनी ठणकावून सांगितले की, माझ्या जनार्दनसाठी मी चिखल तुडवत जाणार. जनार्दन याचे नि:स्वार्थी कार्य आहे, तो काही मागत नाही, हे मला शल्य आहे.
कोरेगावचे माजी आमदार स्व. शंकररावजी जगताप आण्णा तर गावच्या प्रत्येक भेटीवेळी सर्वप्रथम आमच्या घरी सर्वांना भेटून आईच्या हातचे चहा-कॉफी, दूध घेत असत. ते म्हणत, जनार्दनचे खूप चांगले नि:स्वार्थी कार्य आहे.
आमदार महेश शिंदे व आपण सर्वजण आमच्या घरी आलात, राज्य शासनाच्या वतीने सन्मान केला, आम्ही व्यक्तीश: आपले आभारी आहोत – राजेंद्र जनार्दन पुराणिक