आमदार दीपक चव्हाण यांनी सुनावले महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडे बोल; टंचाई परिस्थितीमध्ये टोलवा टोलवी सहन केली जाणार नाही


दैनिक स्थैर्य | दि. 19 जानेवारी 2024 | फलटण | तालुक्यातील बऱ्याच गावांच्या पाणी पुरवठा योजनांना थ्री फेज लाईट सद्यस्थितीत सुरू आहे. त्यामुळे पूर्ण वेळ पाणी पुरवठा करण्यास अडचण येते. थ्री फेज वरून सिंगल फेज लाईट कनेक्शन करब्याबाबतचा प्रस्ताव महावितरणकडे दाखल करण्यात आले आहेत. परंतु महावितरण कडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने आमदार दीपक चव्हाण यांनी महावितरण अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत टंचाईसारख्या महत्वाच्या विषयामध्ये महावितरण अधिकारी हे टोलवा टोलवीची उत्तरे देत असून त्यांनी जबाबदारीने काम करावे; जनतेची कामे करण्यासाठीच महावितरण कार्यरत आहे; असे यावेळी स्पष्ट केले.

फलटण पंचायत समितीच्या सभागृहात टंचाई आढावा बैठक आमदार दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. यावेळी आमदार दीपक चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, अप्पर तहसीलदार दादासाहेब दराडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

फलटण तालुक्यात बऱ्याच गावांमध्ये टँकर चालू करण्यात आले आहेत. जनावरांना सुद्धा आता चाऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात चारा डेपो किंवा चारा छावणी सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. ज्या गावांमध्ये पाण्याच्या पाईपलाईन नादुरुस्त आहेत; त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर किंवा गरज असल्यास पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर दुरुस्ती करण्यात यावी; असे निर्देश आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी दिले.

ज्या गावांमध्ये खाजगी किंवा सरकारी विहिरी आहेत त्या अधिग्रहित करून त्यामधून तातडीने पाणी पुरवठा करण्यात यावा. आता सद्यस्थितीत असलेल्या विहिरीचे खोलीकरण व गरज असेल तर आडवे बोअर मारण्याची कार्यवाही करण्यात यावी. तालुक्यामध्ये असणारे पाझर तलावातील गाळ काढून दुरुस्त करण्यासाठी नेमके काय नियोजन करता येईल जलसंपदा विभागाकडून जर ह्या योजना दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरण करण्यात आल्या तर नक्कीच त्याची देखभाल चांगल्या पद्धतीने करता येईल. तालुक्यातील ज्या ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनांना सिंगल फेज लाईट कनेक्शन करून पाहिजे त्या ग्रामपंचायतींनी गटविकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा; असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण तालुक्यात कोणत्याही गावांमध्ये टंचाईच्या निमित्ताने कोणतीही कामाची गरज असो त्यामध्ये विहीर खोलीकरण, विंधन विहीर, पाईपलाईन दुरुस्ती किंवा नव्याने पाईपलाईन यासोबतच सर्वात शेवटी टँकरचे प्रस्ताव तयार करून संबंधित विभागात सादर करावेत व तरी कार्यवाही झाली नाही तर थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.

प्रास्ताविक व आभार गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!