फलटण: मेगा प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये १०५ विद्यार्थ्यांची निवड


उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयात आयोजित मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये २० नामांकित कंपन्यांनी सहभाग घेत तब्बल १०५ विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०९ मे : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या रोजगार मेळाव्यात २० नामांकित कंपन्यांनी सहभाग घेत तब्बल १०५ विद्यार्थ्यांची विविध पदांसाठी निवड केली आहे.

१४७ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग:

हा मेगा प्लेसमेंट ड्राईव्ह फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यामध्ये एकूण १४७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सहभाग नोंदवला होता. कृषी, ॲग्री-टेक आणि ॲग्री-बिझनेस क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राशी थेट संवाद साधण्याची आणि कौशल्यांची चाचणी घेण्याची सुवर्णसंधी मिळाली.

कृषी क्षेत्रातील रोजगार संधींचा लाभ घेण्याचे आवाहन:

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयीन समितीचे उपाध्यक्ष शरदराव रणवरे आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उद्यानविद्या आणि कृषी क्षेत्रात नव्याने उपलब्ध होत असलेल्या विविध रोजगार संधींचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक बळकट झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

यशस्वी नियोजन व विद्यार्थ्यांचे कौतुक:

उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर आणि कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेसमेंट समन्वयक प्रा. ए. ए. शिंदे व डॉ. एन. ए. यादव यांनी या उपक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

प्लेसमेंटद्वारे निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, विश्वजितराजे नाईक निंबाळकर, सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!