दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२३ | पुणे |
रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यालयात येथे रेल्वेच्या अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुणे व सोलापूर विभागातील रेल्वेच्या प्रस्तावित कामांसंदर्भात, अपूर्ण योजनांसंदर्भातील मागण्यांकडे अधिकार्यांचे लक्ष वेधून प्रशासनाला धारेवर धरले.
पुणे रेल्वे विभागीय कार्यालय येथे पुणे व सोलापूर विभागातील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये प्रस्तावित फलटण पंढरपूर रेल्वेमार्ग भूसंपादन, फलटण – पुणे वेळेमध्ये बदल, फलटण – मुंबई नव्याने रेल्वे चालू करणे, फलटण – बारामती रेल्वेमार्गाच्या काम जलद गतीने करणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील अमृत भारत योजनेत समाविष्ट रेल्वे स्थानकाच्या सुधारणेबाबत आढावा, या व्यतिरिक्त सेतूबंधनमध्ये मंजूर असणारे कुर्डूवाडीसह उड्डाण पूल आरओबी, तसेच मागणी केलेले मतदार संघातील आरयूबी, मागणी असणार्या स्थानकावर लोणंद, माढा, जेऊर, कुर्डूवाडी, पारेवाडी, मोडनिंब, सांगोला, डोंगरगाव, मोहोळ यातील काही ठिकाणी मंजूर केलेल्या थांब्याबाबत रेल्वेमंत्री व रेल्वे प्रशासनाचे आभार मानण्यात आले व नवीन थांबे देणेबाबत, गुड्स शेड उभारणी करणेबाबत, माढा, मोडनिंब, सांगोला मालधक्का यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधून प्रशासनाला धारेवर धरले.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, धैर्यशील माने, वंदनाताई चव्हाण, सुधाकर शृंगारे, श्रीरंग आप्पा बारणे, ओमराजे निंबाळकर, जयसिद्धेश्वर स्वामीजी, सदाशिव लोखंडे, नरेश लालवाणी महाप्रबंधक, इंदू दुबे व दोहरे पुणे तथा सोलापूर विभागीय रेल प्रबंधक, अभय मिश्रा उपमहाप्रबंधक, रेल्वेच्या विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.