दैनिक स्थैर्य | दि. ९ सप्टेंबर २०२३ | सातारा |
समाजात माध्यमकर्मी, त्याचबरोबर सामान्य माणूस सध्या सोशल मिडियाचे शस्त्र घेऊनच वावरतो. त्याचा योग्यप्रकारे वापर करून शब्द, शिस्त, वागणूक, विचार योग्य दिशेने वळवून अनिष्ट प्रथा दूर करून समाजएकसंध करण्यासाठी प्रयत्न करणे, ही माध्यमांची जबाबदारी आहे. माध्यमांनी आपल्या ताकदीचा वापर समाज संपृक्त करण्यासाठी वापरावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते व व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी केले.
येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालय व विश्व संवाद केंद्र, पुणे यांच्यावतीने आयोजित माध्यम संवाद परिषदेत ‘माध्यमांची ताकद व माध्यमांचा गैरवापर’ या विषयावर ते बोलत होते.
‘स्लो पॉयझनिंग’ प्रमाणे चुकीच्या गोष्टी समाजमनावर बिंबवल्या गेल्या. त्यातून बाहेर पडणे व मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणे, ही काळाची गरज आहे. अलिकडे माध्यमांकडून आपल्या वार्तांकनाचा वाचक, प्रेक्षक यांच्यावर काय परिणाम होईल, याचा विचार फार कमी प्रमाणात केला जातो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
नियम हे शिस्तबद्ध चाकोरीतून समाजाला पुढे नेण्यासाठी असतात. राष्ट्रकल्याणार्थ नियम होत असतील तर ‘राष्ट्र प्रथम’ हाच पाया मानून त्याविषयी योग्य पद्धतीने मांडणी करणे, ही माध्यमांची जबाबदारी आहे. आपल्या हातात असलेल्या ताकदीचा सर्वच माध्यमांनी राष्ट्र सर्वतोपरी, हा विचार पुढे नेण्यासाठी वापर केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
श्रोत्यांच्या विविध प्रश्नांनाही राहुल सोलापूरकर यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. प्रारंभी दीपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजन तसेच भारतमाता पूजन झाले. नगरवाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर, विश्वस्त समिती अध्यक्ष श्री. अनंत जोशी यांनी विश्व संवाद केंद्र, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष श्री. अभय कुलकर्णी, व्याख्याते श्री. राहुल सोलापूरकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय जोशी यांचा सत्कार केला.
प्रास्ताविकात श्री. अभय कुलकर्णी यांनी विश्व संवाद केंद्राचे कार्य तसेच माध्यम संवाद परिषदेचे प्रयोजनही सांगितले. जगाला दिशा देणार्या आपल्या देशातील प्राचीन संस्कृती – परंपरेची महती, त्याचबरोबर राष्ट्रीय विचार पोहोचवणे हे माध्यमांचे काम आहे आणि या दृष्टीनेच सर्व माध्यमांतून काही विधायक विचार होण्यासाठी त्यांचा संवाद घडवणे, हा विश्वसंवाद केंद्राचा हेतू श्री. कुलकर्णी यांनी प्रतिपादन केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह श्री. विजय जोशी यांनी समारोप करताना नागरिकांची जबाबदारी किती वाढते आहे, हे सर्वच माध्यमकर्मींना समजावे यासाठी ही परिषद घेतल्याचे सांगितले. त्याचबरोबर समाजमन बदलणे, घडवणे यासाठीही या परिषदेचा निश्चित उपयोग होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आभार प्रदर्शन नगर वाचनालय विश्वस्त समिती अध्यक्ष अनंत जोशी यांनी केले. नगर वाचनालयाच्या कार्यवाह सौ. वैदेही कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन संपदा देशपांडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विविध माध्यमांतील प्रतिनिधी, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अनिल दातीर, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष व जनता बँकेचे संचालक श्री. विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ लेखक श्री. राजेंद्र माने, श्री. प्रदीप कांबळे, डॉ. दिपक निकम, सामाजिक कार्यकर्ते श्री. रविंद्र झुटिंग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.