प्रवास होणार सुखकर! मल्हारपेठ-पंढरपूरसह मायणी रोड टकाटक, त्रासलेल्या नागरिकांना दिलासा


स्थैर्य,मायणी,दि १४: बायपास रस्त्यावर कंत्राटदाराने मुरूम टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे व निर्माण झालेल्या दलदलीने त्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. 

येथील बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर रोडच्या दर्जोन्नतीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेल्या बायपास रोडने वाहतूक वळवण्यात आली आहे. त्या रस्त्यावर खडीकरणही करण्यात आलेले नाही. परिणामी, अवजड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी रोड खचत आहे. मोठे खड्डे पडत आहेत. रस्त्याकडेलाच नागरिकांनी सांडपाणी सोडलेले आहे. सार्वजनिक काही गटाराचे पाणी सुद्धा त्या रस्त्यावर येते. त्यामुळे रस्त्यावर सतत दलदल असते. त्या दलदलीतून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. अचानक दलदलीत फसून दुचाकी चालकांना अपघात झाले आहेत. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. 

दरम्यान, येथील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्ता वाहतुकीस बंद करण्यापूर्वी लोकांची वाहतुकीची गैरसोय टाळणे आवश्‍यक होते. तात्पुरत्या बायपास रस्त्यावर किमान मुरमीकरण व खडीकरण करणे आवश्‍यक होते. मात्र, त्यांनी बेफिकिरीने व मनमानी करत त्याकडे कानाडोळा केला. ग्रामपंचायतीसह स्थानिक नेते व गावगाड्यातील प्रमुख कार्यकर्तेही मूग गिळून गप्प बसले होते. त्यांनी आवश्‍यक पाठपुरावा केला नाही. बायपास रस्त्यावर किमान मुरूम टाकण्याची मागणी लोकांनी ग्रामपंचायतीकडे लावून धरली होती. त्या परिस्थितीत “मायणीत बायपास रोडच्या ऑपरेशनची गरज’ या मथळ्याखाली “सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी संबंधित कंत्राटदाराचे कान उपटले. तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे कंत्राटदाराने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतल. रस्त्यावर मुरूम टाकण्यास सुरुवात केली आहे. ते काम सुरू होताच नागरिकांनी कामाच्या छायाचित्रांसह सोशल मीडियावर कामाचे श्रेय देत “सकाळ’ला धन्यवाद दिले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!