ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. मॅक्सिन बर्नसन यांना ‘दीपशिखा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान; ९१ हजारांचा निधी सुपूर्त

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

मातृभाषेतील शिक्षण व वंचित मुलांच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या डॉ. मॅक्सिन बर्नसन यांना बेंगळुरू येथे दीपशिखा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्थैर्य, बेंगळुरू, दि. ०७ ऑक्टोबर : मातृभाषेतून शिक्षण आणि वंचित तसेच ग्रामीण भागातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. मॅक्सिन बर्नसन यांना ९१ व्या वाढदिवसानिमित्त ‘दीपशिखा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सावली शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा यांच्या वतीने बेंगळुरू येथे हा गौरव सोहळा पार पडला.

मराठी भाषेला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा

अमेरिकेत जन्मलेल्या डॉ. बर्नसन यांनी महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानत मराठी भाषा आणि शिक्षण क्षेत्राशी अतूट नाते निर्माण केले. त्यांनी ‘प्रगत शिक्षण संस्था’ आणि ‘कमला निंबकर बालभवन’ या संस्थांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाला नवी दिशा दिली. परदेशी नागरिकांना मराठी शिकवण्यासाठी दर्जेदार अभ्यासक्रम तयार करून त्यांनी मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली.

९१ हजार रुपयांचा कृतज्ञता निधी सुपूर्त

सावली संस्थेच्या अध्यक्षा रेश्मा मोरे आणि खजिनदार रूपाली निकाळजे यांच्या पुढाकाराने बेंगळुरू येथे जाऊन हा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी डॉ. बर्नसन यांना ९१ हजार रुपयांचा कृतज्ञता निधी सुपूर्त करण्यात आला. त्यांच्या कार्याची प्रेरणा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या वेळी व्यक्त करण्यात आला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!