दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । सातारा । जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घेऊन आपली प्रकरणे तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जे. धोटे यांनी केले.
जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले या लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. धोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, जिल्हा न्यायाधीश ए. एस. जाधव, वकील संघाचे अध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, जिल्हा सरकारी वकील ॲङ महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जे. धोटे म्हणाल्या, राष्ट्रीय लोकअदालत ही पक्षकारांच्या कल्याणासाठी असून यामध्ये कोणत्याही पक्षकाराचे नुकसान केले जात नाही. लोकअदालतीमुळे पक्षकारांचा वेळ, पैसा वाचणार आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकरांनी सहभाग नोंदवून आपली प्रकरणे मिटवावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
या वर्षातील हे तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. आज होणाऱ्या सातारा मुख्यालय व तालुकास्तरीय न्यायालयात 9 हजार 439 प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. तसेच सातारा मुख्यालयात 12 पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे असे, प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी सांगितले.
या कार्यक्रमास जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, वकील, पक्षकार उपस्थित होते.