स्थैर्य, बारामती, दि. 07 : यंदा लॉकडाऊनमुळे लाखो कामगार आपापल्या मूळ गावी परतले आहेत. या परप्रांतीय कामगारांच्या स्थलांतरामुळे औद्योगिक कंपन्यांना सध्या मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. या उपलब्ध परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी राज्यातील युवकांनी रोजगाराची संधी स्वीकारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. रोहित पवार यांनी केले आहे.
‘आज बहुतांश कंपन्या मनुष्यबळाच्या शोधात आहेत. ही स्थिती आणखी किती काळ राहील हे सांगता येत नाही. त्यामुळे आरोग्यविषयक दक्षता घेऊन आजची संधी न दवडता आणि कोणतंही काम कमी न समजता मराठी युवांनी तातडीने कंपन्या जॉईन करण्याचा विचार करावा’. असे आवाहन रोहित पवार यांनी ट्विट करत केले आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त बेरोजगार युवकांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या बेरोजगार युवक-युवतींकडून गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. प्राप्त झालेले अर्ज जागा रिक्त असलेल्या संबंधित कंपन्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.