दैनिक स्थैर्य । दि. 27 नोव्हेंबर 2024 । फलटण । फलटण – बारामती तालुक्यातील शेतकर्यांना वरदान ठरलेले निरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांमध्ये प्रशासनाच्या नियोजनाअभावी पाण्याचा खडखडाट दिसून येत आहे. यातील गोखळी – मेखळी नजीक गीतेवस्ती येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे बंधार्यातून पाणी गळती होऊन बंधारा पूर्णपणे कोरडा पडला आहे. यामुळे परिसरातील शेतकर्यांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत असून शेतातील उभी पिके कशी जगवायची? या काळजीने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. या बंधार्यावर फलटण तालुक्यातील गोखळी आणि बारामती तालुक्यातील मेखळी परिसरातील संपूर्ण शेती पिके अवलंबून आहेत.
सध्या शेतात ऊस कापूस, फळभाज्या, पालेभाज्या, पिके आहेत. कापूस काढून गहू, हरभरा पेरणी करायची आहे. मात्र नदीमध्ये पाणी नसेल तर पिकांची पेरणी करणार कशी? हा प्रश्न शेतकर्यांना सतावत आहे.
मुळात बंधारे अडवताना पाटबंधारे खात्याने शेवटचा बंधारा भरल्यानंतर वरचा बंधारा भरणे आवश्यक असताना वरुन बंधारे अडविले तर खालच्या बंधार्यामध्ये पाणी कोठून येणार? अशी समस्या या ठिकाणी निर्माण झाली आहे. सध्या नदीपात्रामध्ये धरणातून पाणी बंद आहे. नदीकाठच्या दोन्ही बाजूकडून बागायती क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असताना नदीच्या पाण्यातील पाणी पातळी कमी होत आहे.
पाटबंधारे खात्याच्या बंधारे अडवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे गीते वस्ती बंधारा कोरडा राहिला आहे. गतवर्षी या बंधार्याची दुरुस्ती करण्यात आली पण अतिशय निकृष्ट काम झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होते. आता प्रशासनाने तात्पुरती डागडुजी काल परवा केली आहे. पण तोपर्यंत नदी प्रवाह थांबला. यंदा परतीचा मान्सून कमी झाला त्यामुळे पाण्याची गरज आहे. आता गीते वस्ती बंधारा पाण्याने भरुन घ्यावा अशी मागणी या बंधार्याच्या पाण्यावर अवलंबून असणार्या फलटण – बारामती तालुक्यातील लाभ धारक शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.
या बंधार्याचे वरती असणारे घाडगेवाडी, नीरा वागज हेही बंधारे भरलेले नाहीयेत. अश्या स्थितीत धरणातून पाणी उपलब्ध करून सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले तरच रब्बी पिके घेता येतील. शिवाय पूर्वी कॅनाल चे रोटेशन लवकर मिळत होते पण गेल्या चार पाच वर्षांत नीरा उजवा डावा कालवा मधून फक्त 4 अपवादाने 5 वार्षिक पाणी पाळ्या मिळाल्या आहेत परिणामी ऊस पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे आता उभी पिके वाचवावीत व रब्बी पिकांचे नियोजन करता यावे यासाठी तातडीने बंधारा भरून देवून पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी बारामती – फलटण तालुक्यातील या बंधार्यावर अवलंबून असणार्यांना शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.