एटीएम जिलेटीनने फोडण्याच्या तयारीत असणारी पाचजणांची टोळी जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२४ | सातारा |
उंब्रज व तळबीड पोलिसांनी मसूर (ता. कराड) येथील एटीएम जिलेटीनने फोडण्याच्या तयारीत असणार्‍या पाच जणांच्या टोळीला शिवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पुलानजीक सापळा रचून पकडले. या टोळीमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

वैभव राजेंद्र साळुंखे (वय ३३), ओमकार बाळासाहेब साळुंखे (वय २३), आदित्य संतोष जाधव (वय १९, सर्व रा. मोळाचा ओढा, सातारा) व एक अल्पवयीन असून अन्य एक जण पळून गेला आहे.

याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी रात्री तळबीड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले हे रात्रगस्तसाठी जाताना शिवडे गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पुलाजवळ पाचजण संशयितपणे आढळून आले.

यावेळी उंब्रज पोलीस व तळबीड पोलिसांनी संशयितांना घेराव घातला असता त्यातील एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. यावेळी पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता संशयितांकडून तीन कटावणी, चार जिलेटीन कांड्या, डेटोनेटर, बॅटरी, दोन एक्सा ब्लेड, करवत, कोयता ब्लास्टींग वायर, दोन मोटरसायकल व चेहर्‍याचे मास्क असा एकूण १ लाख ३७ हजार ९८० रुपये किंमतीचे साहित्य हस्तगत केले.

पोलिसांनी संशयितांकडे अधिक चौकशी केली असता, संशयितांनी आठ दिवसांपासून मसूर येथील हिताची कंपनीचे एटीएम सेंटर जिलेटीनने उडवून टाकण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले. तसेच सदर जागेची व एटीएमची चार दिवसांपूर्वी रेकी केली होती. त्यानुसार दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना तळबीड व उंब्रज पोलिसांनी संयुक्त कारवाई करून संशयित दरोडेखोरांना ताब्यात घेतले.

यावेळी तळबीड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले, पोलिस हवालदार निलेश विभुते, पाटील यांच्यासह उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलिस हवालदार धुमाळ, साळे, माने यांनी कारवाई केली.

अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!