दैनिक स्थैर्य | दि. ३० जुलै २०२३ | फलटण |
‘अरिहंत ऑटोमोबाईल’चे सर्वेसर्वा मंगेश भाई दोशी हे गेली तीस वर्षे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करीत असताना त्यांनी उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून फलटण, दहिवडी, वडूज व सातारा येथे १४ शाखांच्या माध्यमातून यशस्वी काम केले आहे. मंगेश दोशी यांनी उद्योग क्षेत्राबरोबर लायन्स क्लबच्या माध्यमातूनही सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता यांनी केले.
रिंग रोड, फलटण येथील ‘अरिहंत टीव्हीएस’ या कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण भारतीय बनावटीची ‘टीव्हीएस आयक्यू’ या मोपेड गाडीचे लॉन्चिंग कार्यक्रमप्रसंगी अरविंद मेहता बोलत होते. याप्रसंगी कराड अर्बन बँकेचे सर्वेसर्वा सुभाषराव जोशी, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, कराड अर्बन बँकेचे सीईओ दिलीप गुरव, लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन भोजराज नाईक निंबाळकर, लायन सुहास निकम, आस्था टाईम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले, आर्किटेक महेंद्र जाधव, अरिहंत टीव्हीएसचे सर्वेसर्वा मंगेशभाई दोशी, साप्ताहिक आदेशचे संपादक विशाल शहा, माजी प्राचार्य शिवलाल गावडे, फलटण लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन डॉक्टर तुषार गायकवाड, अतुलशेठ कोठाडिया आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
अरविंद मेहता म्हणाले की, मंगेश दोशी यांनी या उद्योगाकडे ‘व्यवसाय’ म्हणून न पाहता टीव्हीएस कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या वाहनांची सुविधा उपलब्ध करून देऊन हा व्यवसाय करीत असताना शेतकर्यांसाठी तसेच शाळकरी मुलांसाठी व उद्योजकांसाठी कोणत्या प्रकारच्या गाड्या उपलब्ध करून देता येतील, त्या गाड्या उपलब्ध करून देत असताना त्याला कर्जाची उपलब्धता कशी करून देता येईल, तसेच त्या गाड्यांची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी कसा उपलब्ध करून देता येईल, याकडे प्रामुख्याने पाहिले. त्यामुळे गेल्या ३० वर्षांमध्ये हा व्यवसाय करीत असताना प्रामाणिकपणाला प्राधान्य देऊन हा व्यवसाय केला आहे.
खर्या अर्थाने व्यवसायाच्या सुरूवातीपासून कराड अर्बन बँकेचे सर्वेसर्वा सुभाषराव जोशी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य उपलब्ध झाले असल्याचे सांगून पुढे मेहता म्हणतात की, ज्याप्रमाणे कराड अर्बन बँक मंगेश दोशी यांच्या पाठीशी उभी राहिली, त्याप्रमाणेच फलटणमधील छोटे-मोठे व्यावसायिक, उद्योजक व शेती क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून काम करणार्या लोकांच्या पाठीशीही कराड बँकेने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले, आगामी काळामध्ये फलटण तालुका हा शंभर टक्के बागायत होऊ पाहत आहे. त्यामुळे या भागातील शेती व्यवसायाला तसेच उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. यामुळे फलटण शहर विकसित होणार असून या शहरातील सर्वच छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायिकांना, शेतकर्यांना फलटण अर्बन बँकेने मदत करावी, अशी अपेक्षाही शेवटी अरविंद मेहता यांनी आपल्या भाषणात बोलून दाखविली.
यावेळी कराड अर्बन बँकेचे सर्वेसर्वा सुभाषराव जोशी यांनी अरिहंत टी.व्ही.एस.च्या उद्योग व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. तसेच याप्रसंगी प्रांतपाल लायन भोजराज नाईक निंबाळकर यांनीही मंगेश जोशी यांच्या भावी व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात मंगेश दोशी यांनी सांगितले की, अरिहंत टी.व्ही.एस. ही नवीन लॉन्च केलेली गाडी संपूर्ण भारतीय बनावटीची स्कूटर असून ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर शंभर किलोमीटर जाते. तसेच या गाडीच्या बॅटरीला तीन वर्षाची वॉरंटी दिली आहे. टीव्हीएसच्या या यशस्वी वाटचालीमध्ये सुरुवातीपासूनच कराड अर्बन बँकेचा मोठा हातभार लागला असून त्यांच्या अर्थसहाय्यामुळेच अरिहंत टी.व्ही.एस.ची ही यशस्वी वाटचाल राहिली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.