स्थैर्य, मुंबई, दि.२५: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यादरम्यान, सदाभाऊंनी राज्यपालांना 12 सदस्यांची यादी दिली आहे. आपल्या संघटनेकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे सुचवली असून, तसे पत्र राज्यपालांना दिल्याचे खोत म्हणाले.
राज्यपालांच्या भेटीनंतर सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खोत म्हणाले की, ‘मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांची नावे राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी सुचवली आहेत.’
> साताऱ्यात उदयनराजेंचा हटके अंदाज; जिप्सी रायडिंग अन् गाण्यावर अफलातून ठेका..
यादरम्यान, सदाभाऊंनी वाढीव वीजबील माफी, ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत, कोविडमध्ये अत्यावश्यक सेवेदरम्यान मृत पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबांना 50 लाखांची मदत, अशा विविध मागण्याही केल्या आहेत. आम्ही आंदोलन केले तर मुख्यमंत्री कोरोनाचे कारण सांगून नाराजी व्यक्त करतात. झपाटलेला या सिनेमातील बाहुल्यासारखे मुख्यमंत्रीही नेहमी कोरोनाचा बाहुला पुढे करतात, असा टोलाही सदाभाऊ खोतांनी लगावला.