जागतिक एडस दिनानिमित्त हे जरुर जाणून घ्या


 

स्थैर्य, दि.१: 1 डिसेंबर म्हणजेच जागतिक एड्‌स दिवस. या पार्श्वभूमीवर या आजाराबद्दल
जनजागृती करण्याकरिता आणि एड्‌सग्रस्त व्यक्तींना समाजातून वेगळे न टाकता
समाजाचा एक भाग बनवून घेण्याकरिता हा दिवस संपूर्ण जगभर साजरा केला जातो.

सुरुवातीला
कर्करोग हा महाभयंकर रोग म्हणून मानण्यात येत होता; परंतु एड्‌सचा शोध
लागून त्यांच्यावर संशोधन झाल्यानंतर एड्‌स हा सर्वात महाभयंकर रोग म्हणून
मानण्यात येऊ लागला. या रोगाचे संक्रमण होण्याची कारणे जरी विविध असली तरी,
त्याचे मुख्य कारण म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध हे आहे.

काहीवेळा
समाजमान्य लग्न या संस्थेतूनसुद्धा एचआयव्हीसारख्या रोगाचे संक्रमण होताना
दिसते. विवाहित जोडप्यांकडून त्यांच्या होणा-या मुलाला या रोगाची लागण होऊ
शकते म्हणून या रोगाला बळी जाऊन आयुष्य उद्‌वस्त करण्यापेक्षा, तो होऊ नये
म्हणून लग्नाआधी या सात वचनांची पूर्तता नक्कीच करावी.

पत्रिकेआधी एचआयव्ही टेस्ट बघा 

लग्न ठरताना समाजातून तसेच दोन्हीही कुटुंबाकडून मुलाची व मुलीची कुंडली जुळावी हा आग्रह असतो.
बदलत्या काळानुसार आधुनिक विचारसरणीच्या लोकांकडूनही अशा
प्रकारच्या मागण्या या होतच असतात. आधुनिकतेच्या काळात जर आपले आयुष्य हे
ख-या अर्थाने सुखी करायचे असेल, तर पत्रिका जुळवण्याआधी एचआयव्ही टेस्ट
नक्कीच करून घ्या. आपल्या कळत नकळत झालेल्या चुकांचा फटका आपल्यामुळे आपला
जीवनसाथी व होणा-या मुलाला होऊ नये म्हणून हा निर्णय अवश्‍य घ्यावा.

वर्षातून एकदा रक्त तपासून घ्या

विविध रक्तदान शिबिरातून जेव्हा रक्त घेतले जाते, तेव्हा आपले रक्त तपासून
मग ते रक्तपेढयांमध्ये जमा केले जाते. स्त्रियांच्या बाबतीत रक्त तपासून
घेणे त्याची चाचणी करणे सहसा केले जात नाही. आजारी पडल्यानंतर रक्ताची
चाचणी करण्यापेक्षा वर्षातून एकदा कुटुंबातील सर्वाचे रक्तगट तपासून
घ्यावे. त्यामुळे आपल्या आरोग्याविषयी एक खात्री निर्माण होते. या तपासण्या
करताना संशय म्हणून नको तर कुटुंबासाठी हे करा.

जोडीदाराबद्दलचा विश्वास कायम ठेवा

लग्न ठरल्यापासून आपल्या जोडीदाराबद्दलच्या प्रत्येक गोष्टीची माहिती
आपल्याला आवश्‍यक असते. त्याच्या पूर्वायुष्यात घडलेल्या घटना, त्याचे
त्यांच्या आयुष्यावर झालेले परिणाम, या सर्व गोष्टी एकमेकांना
सांगितल्यानंतर दोघांमध्ये निर्माण होणारा विश्वास कायम ठेवणेही तितकेच
महत्त्वाचे ठरते. पती आणि पत्नीमधील तणाव हे परस्पर संवादातून सोडवून
त्यावर मार्ग काढला गेला तर तो विश्वास कायम राहू शकतो.

संपत्तीपेक्षा आरोग्य अधिक महत्त्वाचे

लग्नाच्या बंधनात अडकताना मुलाचा आणि मुलीचा आर्थिक स्तर हा महत्त्वाचा
ठरतो. आपल्या इकॉनॉमिकल स्टेट्‌सला अनुरूप जोडीदार असावा, अशी प्रत्येकाची
मागणी असते. असा आग्रह असणे चुकीचे नाही; परंतु आपल्या जोडीदाराचे आरोग्य
हे जास्त महत्त्वाचे आहे. संपत्ती आपल्या प्रयत्नातून कमवता येते; परंतु
आरोग्य एकदा आपल्या हातातून निसटले, तर ते पुन्हा मिळवता येणे अशक्‍य होते.

लग्नाआधी चौकशी योग्यच, पण..

आजही लग्न ठरवण्याआधी मुला-मुलींच्या घरच्यांकडून त्यांच्याविषयी अधिक
माहिती काढण्यासाठी आजूबाजूच्यांकडे विचारपूस करण्याची एक पद्धत होती. अगदी
शाळेतल्या शिक्षिकेपासून शेजा-यांपर्यंत अशा प्रकारच्या चौकशा केल्या जात.
याचा उद्देश हा त्या व्यक्तीवरील अविश्वास नसून, त्याच्या
पूर्वायुष्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी केलेला हा प्रयत्न असतो. अशा
प्रकारच्या चौकशीतून मुला-मुलींच्या सवयी माहीत होतात, मात्र अशा इतरांकडून
माहिती गोळा करून त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपणच खरी माहिती द्यावी.

मुला-मुलींचा ठाम निर्णय

लग्नासाठी योग्य जोडीदार निवडताना मुलाच्या आणि मुलींच्या काही अटी असतात.
त्या अटी प्रत्येकाने मान्य कराव्या अशी त्यांची इच्छा असते. सुशिक्षित
असावा, स्वत:चे घर असावे, या काही अटींमध्ये आपल्या जीवनसाथीने लग्नाआधी
सर्व आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्यात, अशा प्रकारची अट घालून त्याच्या
पूर्तीसाठी ठामपणे उभे राहून आपली भूमिका सिद्ध करणे तितकेच गरजेचे आहे.

पालकांचा पाठिंबा

कित्येकदा लग्नानंतर एचआयव्हीसारख्या रोगाची लागण आपल्या जोडीदाराला
झाल्याचे निदर्शनास येते, अशावेळी आपल्याकडे कोणताच पर्याय शिल्लक नसतो.
आपल्या काही मागण्या पालकांनी अमान्य केल्याने आयुष्यभर दु:ख झेलणे हा
एकमेव पर्याय उरतो. जर लग्नाआधी पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या निर्णयाला
साथ दिली, तर भविष्यात त्यांच्यावर एकमेकांना दूषण लावण्याची वेळ ओढवणार
नाही. प्रत्येक कुटुंबाने, या त्यातील व्यक्तींनी अतिविश्वासाने घेतलेला
निर्णय चुकण्यापेक्षा सुरक्षित लग्नसंस्था घडविण्याकडे अधिक लक्ष दिले, तर
नक्कीच लग्नसंस्थेतून होणारे एचआयव्हीचे संक्रमण कमी होऊ शकते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!